शेतकऱ्यांना रडवतोय कांदा, फुलांचाही वांदा... 

दत्ता भोंगळे
गुरुवार, 28 मे 2020

कांदा काढून आजही शेतातच पडून आहे. बाजारभाव व विक्रीसाठी पुरेशी साधने नसल्यामुळे कांदा विक्रीला न्यायचा कसा, असा प्रश्न आहे.

गराडे (पुणे) : शेतात एक एकर क्षेत्रावर गतवर्षी कांदा लागवड केली होती. त्यात दीड लाख रुपये मिळाले होते. पण या वर्षी याच एक एकरात कांदा काढून शेतात पडला आहे. आतापर्यंत फक्त तीन हजार रुपये हातात आले आहेत. तसेच, शेतात फुलांचे पीक उभे आहे. पण, लॉकडाउनमुळे फुलांची विक्री होत नाही. आता लॉकडाउन उठणार तरी कधी? शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?, असा सवाल पुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथील शेतकरी व बळिराजा शेतकरी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव खेंगरे पाटील यांनी केला आहे. 

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

त्यांनी सांगितले होते की, मागिल वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे सद्या विहिरीला पाणी भरपूर आहे. त्यामुळे कांदा पीक जोमात आले होते. पण, हा कांदा काढून आजही शेतातच पडून आहे. बाजारभाव व विक्रीसाठी पुरेशी साधने नसल्यामुळे कांदा विक्रीला न्यायचा कसा, असा प्रश्न आहे. सासवड येथे तालुक्याची मोठी बारपेठ आहे. कांदा पिकात झालेला खर्च निघाला, तरी ज्यांचे हात उसणे पैसे घेतले आहेत, ते तरी परत करता येतील. पण, सातत्याने वाढत जाणारा लॉकडाउन पाहिला तर हे अनेक दिवस शक्य नाही, असे दिसत आहे. 

- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 

या वर्षी पाच पांडात गलांडा पिवळी फुले याचे रोप घरी तयार करून लागवड केली आहे. दीड महिना लागवड होऊन आता फुलांचा मळा बहरला आहे. ७० ते ८० हजार रुपये या फुलांचे गतवर्षी झाले होते. पण, या वर्षी फुले विक्रीला नेण्याची ठिकाणे नसल्याने व सातत्याने लॉकडाउनमध्ये गावे व शहरे बंद आहेत. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार रुपये फुलांचे झाले आहेत. प्रार्थनास्थळे, मंदिरे व विक्री ठिकाणे, हे सर्व बंद असल्यामुळे फुलांना कोठेच मागणी नाही. शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या या नुकसानाबाबत शासनाने निश्चित धोरण अवलंबावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
फुल लागवडीपासून आतापर्यंत पाच हजार रुपये खर्च झाले आहेत. शेतात फुलांच्या शेतात उभे राहिल्यावर बहरलेला भाग पाहून आनंद होण्याऐवजी ही फुले जाग्यावरच कोमेजून जाऊ लागली असल्यामुळे व आर्थिक नुकसानीला मला तोंड द्यावे लागत आहे. 
- महादेव खेंगरे पाटील, उपाध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघाचे जिल्हा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: purandhar- Farmers are in trouble as onions are not being sold