esakal | थकीत बिलासाठी ठेकेदार संघटनेचे पुण्यात आंदोलन | Agitation
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

थकीत बिलासाठी ठेकेदार संघटनेचे पुण्यात आंदोलन

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - कोरोना महामारीपासून गेली दीड वर्षे १० ते १५ टक्के बिल दिले असून, उर्वरित थकीत बिले दिवाळीपूर्वी द्यावीत या मागणीसाठी पुणे जिल्हा ठेकेदार संघटनेतर्फे शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस.एस. साळुंखे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता एस.एस.माने यांना दिली.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी अशोक ढमढेरे, प्रमोद पऱ्हाड, दीपक जाधव, अभिजित ठाकर, अनिल सोनवणे, सुभाष टाकळकर आदी उपस्थित होते.

कोरोनाची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. शासनाकडून मिळालेल्या अल्प निधीत ठेकेदारांना बँकेच्या कर्जाचे हप्ते, मजूर व कामगारांचे पगार, इंधन व मेन्टेनस खर्च, पुरवठादारांचे देणे आदी देणी थकल्यामुळे ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. एका शासकीय ठेकेदारावर १५० ते २०० लोकांची उपजीविका चालते. परंतु ठेकेदारांची शासकीय बिले थकल्याने सर्वच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा: डॉक्‍टर महिलेचा विनयभंग; महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक

प्रत्येकवेळी ओला व कोरडा दुष्काळ, चक्रीवादळ आदी नैसर्गिक संकटात शासन ठेकेदारांच्या देण्यावर वजावट करते. लोक प्रतिनिधी विकासाचे स्वप्न पाहतात त्यासाठी निधी उपलब्ध नसला तरी ठेकेदार सदर कामे करतात. शासनाच्या विकासात शासकीय ठेकेदारांचा मोठा वाटा असतो. परंतु ठेकेदाराने केलेल्या कामाची देयके मात्र शासन वेळेत देत नसल्याने शासकीय ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिवाळीपूर्वी थकीत बिले मिळाली नाहीतर सर्व विकासाची व रस्त्याची कामे बंद करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेच्या मागणीचे निवेदन शासनाला कळवून थकीत बिले देण्याविषयी कार्यवाही करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळला दिली.

loading image
go to top