खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळेsakal

मंत्रिपदाचा फायदा कंत्राटदारांना नको, सुप्रिया सुळे यांनी लगावला टोला

पुणे, ता. १० : ‘‘संविधानानेच देश चालेल हे देशातील जनतेने दाखवून दिले आहे. ‘पन्नास खोके इज नॅाट ओके’ हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली आहे. पुण्याला मंत्रिपद मिळाले त्यात मला आनंद आहे, पण त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा आहे’’, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. विविध मुद्यांना सुळे यांनी हात घातला. सुळे म्हणाल्या, ‘‘राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा आहे, हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने ते तात्पुरते असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अद्यापही पूर्णपणे त्यांचा झालेला नाही’’.
तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह घेणे तुम्हाला परवडणार का? या प्रश्नावर सुळे यांनी ‘‘काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात. त्यामुळे काही गोष्टी पोटात ठेवणेच योग्य असून पोटातले ओठावर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते’’, असे सांगत भविष्यात आपला पक्ष तुतारी वाजवणारा माणूस याच चिन्हावर निवडणुका लढवेल असे संकेत त्यांनी दिले.
‘‘पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. कोयता गॅंग तोडफोड करत आहे. पावसात संपूर्ण शहरात पाणी तुंबत आहे. ससून रुग्णालयाची बदनामी सुरू आहे. या सगळ्या घडामोडीमुळे पुण्यात प्रशासन आहे का? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्षविरहीत फोरम स्थापन करण्याची गरज आहे’’, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले.

धंगेकर ‘कमबॅक’ करतील
रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभूत केले होते. धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी धक्कादायक आहे. धंगेकर हे ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा कसब्यातून आमदार होतील, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला आहे.

दुसऱ्यांच्या घरात का डोकवायचे?
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या पर्वाचा शपथविधी काल पार पडला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, याविषयी विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘‘हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण दुसऱ्यांच्या घरात का डोकवायचे? तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास टाकत कॅबिनेट मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. तसेच प्रफुल्ल पटेल यांना स्वतंत्र पदभार देखील दिला होता’’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com