पुणे विद्यापीठात नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यावर आता येणार नियंत्रण

Pune-University
Pune-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यावर व्यवस्थापन परिषदेने नियंत्रण आणले आहे. नवे अभ्यासक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तरच त्यांस मान्यता मिळेल. विद्यापीठ फंडातून त्यावर खर्च केला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्याने पदव्युत्तर पदवी, संशोधनासह पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते. हे अभ्यासक्रम विद्यापीठाचे असल्याने कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. त्याशिवाय इतर सुविधांचा लाभ मिळतो. मात्र गेल्या काही काळात पदवी व पदविका अभ्यासक्रमांची संख्या वाढत आहे.

काही अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकवले जातात, तरीही विद्यापीठात सुरू आहेत, हे लक्षात आल्याने व्यवस्थापन परिषदेत यावर चर्चा झाली. त्यानंतर नवे अभ्यासक्रम स्वयंअर्थसाह्य नसतील तर त्यांना परवानगी देऊ नये, असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांना परवडणारे असेल यावर लक्ष ठेवले जाईल.

नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांचे स्वागत
जे अभ्यासक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील त्यांनाच मान्यता द्यावी, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला आहे. जे पदविका, पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकवले जात नसतील, असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी विद्यापीठ तयार आहे, असे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात विद्यापीठ

  • ४ - विद्याशाखा 
  • ८१ - पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम  
  • १५ - पदवी अभ्यासक्रम
  • ६६ - पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम 
  • ५५ कोटी - अभ्यासक्रमांसाठी तरतूद

विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदविकेचे शुल्क वेगळे आहे, त्याचा खर्चाचा तपशीलही वेगळा आहे; पण यावर नियंत्रण आवश्‍यक आहे. नवीन अभ्यासक्रमांना बंदी नसेल; पण हे अभ्यासक्रम सुरू करताना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का, याची तपासणी केली जाईल. 
- प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

विद्यापीठात कमी शुल्कात चांगले शिक्षण मिळते, त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेतात; पण सर्वच प्रकारचे शुल्क वाढविण्याचे विद्यापीठाचे धोरण दिसून येत आहे. इतर गोष्टींवरचा खर्च कमी करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हा निधी खर्च झाला पाहिजे. 
- एक  विद्यार्थी, पुणे विद्यापीठ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com