Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

राज्य सरकारकडून दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मागील दोन वर्ष राज्य सरकारने रेडी रेकनर मधील दर 'जैसे थे' ठेवत नागरिकांना दिलासा दिला होता.

पुणे : राज्यात 1.74 टक्के, तर ग्रामीण भागात 2.81 टक्‍क्‍यांनी रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून जाहीर करण्यात आली. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात 1.29 टक्के, तर महापालिकाच्या क्षेत्रात 1.74 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वाढ ही पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात करण्यात आली आहे. 

नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी चालू वर्षीच्या रेडी-रेकनरच्या दरात ही वाढ जाहीर करण्यात आली. यंदा प्रथमच राज्यातील काही भागात सध्या असलेल्या रेडी-रेकनरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अल्पशी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.११) रात्री बारा वाजल्यापासून ही वाढ लागू करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

तुम्ही लठ्ठ आहात? तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक!​

राज्य सरकारकडून दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मागील दोन वर्ष राज्य सरकारने रेडी रेकनर मधील दर 'जैसे थे' ठेवत नागरिकांना दिलासा दिला होता. दरम्यान मार्चपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्याच कामात अडकले होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचे रेडी रेकनरचे दर 31 मे 2020 पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर पुन्हा आदेश काढून पुढील आदेश होईपर्यंत त्याला स्थगिती कायम ठेवण्यात येत असल्याचे सुधारित आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले होते. 

मात्र शुक्रवारी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक मंदी आणि कोरोनाची पार्श्‍वभूमी विचारात घेऊन रेडी-रेकनरच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील ग्रामीण क्षेत्रात गावांमध्ये सरासरी 2.81 टक्के, प्रभाव क्षेत्रातील गवांमध्ये सरासरी 1.89 टक्के, नगरपरिषद आणि नगर पचायत क्षेत्रात 1.29 टक्के, तर महापालिकेच्या हद्दीत सरासरी 1.74 टक्के वाढ करण्यात आली आहे.'' 

डिजिटल बॅंकिंग वापरणाऱ्यांचा टक्का वाढला; कोरोनामुळे झाली मोठी वाढ​

राज्यात रेडीरेकनरमध्ये आजपर्यंत झालेली वर्षनिहाय वाढ 
    वर्ष       झालेली वाढ 
2011-12 - 18 टक्के 
2012-13 - 37 टक्के 
2013-14 -27 टक्के 
2014-15 - 22 टक्के 
2015-16 - 14 टक्के 
2016-17 - 7 टक्के 
2017-18 - 5.30 टक्के 
2018-19 - वाढ नाही 
2019-20 - वाढ नाही 
2020- 21 - 1.74 टक्के 

पुणे जिल्ह्यात झालेली वाढ पुढीलप्रमाणे :

* पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरासरी वाढ 8.62 टक्के 
* प्रभाव क्षेत्रात झालेली वाढ 2.92 टक्के 
* नगरपालिका हद्दींमध्ये झालेली वाढ 5.4 टक्के 
* पुणे महापालिका हद्दीत झालेली वाढ 1.25 टक्के 
* पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत झालेली वाढ 3.41 टक्के 
* पुणे जिल्ह्यात सर्व मिळून झालेली वाढ 3.91 टक्के 

यापूर्वी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यात रेडी-रेकनरच्या दरात वाढ करण्याची तरतूद होती. दरात कपात करण्याची तरतून नव्हती. दोन वर्षांपूर्वी दरात कपात करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली. यंदा प्रथमच त्याचा वापर करून मुंबईत सध्याच्या दरात 0.6 टक्‍क्‍यांनी कपात करण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यातील अनेक भागातील रेडीरेकनरच्या दरात कपात करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

अजित पवार म्हणतात, 'मला अॅक्‍शन' घ्यायला भाग पाडू नका'​

राज्यातील अन्य शहरांमध्ये झालेली वाढ पुढील प्रमाणे :-
- नाशिक जिल्ह्यात 1.64 टक्के, मनपा हद्दीत 0.74 टक्के 
- ठाणे जिल्हा 1.42 , मनपा हद्दीमध्ये 0.36 
- नवी मुंबईमध्ये 0.99 
- मिरा-भाईंदर 0.25 
- उल्हासनगर 0.97 टक्के 
- राजगड जिल्ह्यात सरासरी 3 टक्के 
- नागपूर जिल्ह्यात 0.60, नागपूर महापालिका हद्दीत 0.1 टक्के 
- सातारा जिल्ह्यात 2.23 टक्के 
- सांगली जिल्ह्यात 1.59 टक्के 
- कोल्हापूर जिल्ह्यात 1.51, तर महापालिका हद्दीत 0.49 टक्के 
- सोलापूर जिल्ह्यात 1.27 टक्के 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra Highest increase in ready reckoner rates is in Pune districts