esakal | उच्चभ्रुंच्या लग्नात कॉपीराईट कायद्याचा धाक दाखवून आणले जातेय "विघ्न'
sakal

बोलून बातमी शोधा

pune

उच्चभ्रुंच्या लग्नात कॉपीराईट कायद्याचा धाक दाखवून आणले जातेय "विघ्न'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंचतारांकीत हॉटेलमध्ये उच्चभ्रु कुटुंबांच्या लग्न सोहळ्यात वाजविण्यात येणारी चित्रपटातील गाणी हि कॉपीराईट कायद्याअंतर्गात येतात, त्यामुळे तुमच्यावर कारवाई करु, असे सांगत उच्चभ्रुंच्या आनंदसोहळ्यावर विरंजण घालत वधु-वरांच्या कुटुंबांकडून खंडणी उकळणाऱ्या कॉपीराईट कंपन्यांच्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दोन कॉपाईट कंपन्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच या प्रकारची गांभीर्याने दखल घेत संबंधीत कंपन्यांना कायद्याचा लगाम लावला.

फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमीटेड (पीपीएल) व नोव्हेक्‍स कम्युनिकेशन प्रा.लि. कंपनी या कंपन्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पंचतारांकीत हॉटेल्स आहेत. याप्रकरणी निखिल करमचंदाणी (वय 30, रा.गणेशखिंड रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी करमचंदाणी यांच्या बहिणीचे 16 ऑगस्ट रोजी बंडगार्डन परिसरातील हॉटेल कॉनरॅडमध्ये लग्न होते. त्यावेळी पीपीएल व नोव्हेक्‍स कंपनीचे पदाधिकारी तेथे गेले, त्यांनी लग्नात वाजविण्यात येणाऱ्या संगीत, गाण्यांसाठी आमचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी घेतली नाही, तर लग्नात अडथळा आणू, पोलिसात तक्रार देऊ अशी धमकी देत त्यांच्याकडून दोन्ही कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी 89 हजार 600 रुपये घेतले. करमचंदाणी यांच्या ओळखीचे राहूल शिरोडकर यांचेही संबंधीत हॉटेलमध्ये लग्न होते. त्यावेळीही पीपीएल कंपनीने त्यांच्याकडून 22 हजार 400 व नोव्हेक्‍स 25 हजार रुपये धमकावून घेतले.

संबंधीत कंपन्यांनी दोन्ही लग्नांसाठी एक लाख 37 हजार रुपयांची खंडणी घेतली. कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकीत हॉटेल्समध्ये आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबीयांमधील लग्न समारंभ पार पडतात. दरम्यान, पीपीएल व नोव्हेक्‍सचे संचालक, पदाधिकारी, अन्य अधिकारी आपापसात संगनमत करून कट रचून लग्न समारंभात खंडणी उकळून फसवणूक असल्याची घटना उघडकीस झाल्यानंत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: सिरींजच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा हात आखडता

संबंधीत कॉपीराईट कंपन्यांसह आणखी काही कंपन्यांकडून वधु-वरांच्या कुटुंबीयांकडून अशा प्रकारे खंडणी उकळण्याचा प्रकार शहरातील पंचतारांकीत हॉटेल्समध्ये घडत आहेत. विशेषतः ग्राहकांकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडत असूनही पंचतारांकीत हॉटेल्स प्रशासनाकडून त्याविषयी पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कॉपीराईट कायद्याची भिती दाखवून ज्या लोकांकडून खंडणी उकळली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लग्नासाठी चित्रपट संगीत, गाणी वाजविल्याने कुठल्याही प्रकारे कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही, असे केंद्र सरकारने 27 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

""एखाद्याच्या लग्नात जाऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा हा प्रकार गंभीर आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याबाबत काही तक्रारी असल्यास नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा.''

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे

loading image
go to top