Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत

मिलिंद संगई
Saturday, 28 November 2020

मानसिक निराशेच्या भावनेतून जे रुग्ण बरे झाले होते, त्यांनाही नव्याने त्रास जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

बारामती : कोरोनानंतरच्या काळात मानसिक समस्यांचे प्रमाण वेगाने वाढू लागले असून नागरिकांनी आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज बारामतीतील मानसोपचार तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गडद होत गेले तशी नैराश्य, एकटेपणा, अनामिक भीती, धडधड वाढण्यासह इतरही अनेक बाबींचा मानसिक त्रास अनेकांना होऊ लागला आहे. अजूनही ते प्रमाण कायमच आहे. मानसिक निराशेच्या भावनेतून जे रुग्ण बरे झाले होते, त्यांनाही नव्याने त्रास जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही​

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे युवकांसह महिलांनाही निराशेने ग्रासले आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींमुळेही तणाव वाढू लागला असून केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही लोकांना नैराश्य आल्याचे दिसत आहे. यातून बाहेर पडणे गरजेचे असून कोरोना अगोदरचे जीवन सर्वांनी जगणे गरजेचे आहे. 

बारामतीतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीरंग साळुंके, डॉ. अपर्णा धालमे आणि डॉ. संताजी शेळके यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या संदर्भात काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत. 

•    वेळेवर झोपा, वेळेवर उठून कामाला लागा.
•    सोशल मीडियाचा अतिवापर टाळा.
•     संगीत, वाचन, गायन यासारखे छंद जोपासा.
•    किमान आठ ते दहा तास व्यवस्थित झोप हवी.
•    ताणतणाव असतील तर ते मित्र, कुटुंबिय यांच्याशी बोला.
•    मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
•    प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
•    योग, सायकल, फिरणे यासह व्यायामावर भर द्या. 
•    शक्य असेल तिथे क्रिडांगणावर जाऊन वेळ व्यतित करा.
•    अगदीच जास्त अस्वस्थ वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

छंद जोपासा... 
वाचन, गाणी ऐकण, गप्पा मारणं किंवा आपल्याला जो काही छंद आहे, तो प्रत्येकाने जोपासा, स्वताःसाठी आवर्जून वेळ द्या, अडचणी किंवा त्रास होत असेल तर तो कुटुंबीय, मित्र किंवा डॉक्टरांशी शेअर करा, प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा
- डॉ. श्रीरंग सोळुंके, मानसोपचारतज्ज्ञ, बारामती.  

संवाद वाढवायचा प्रयत्न करा...
लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांशी संवाद वाढला असला तरी सामाजिक संवाद कमी झाला आहे, सोशल मिडीयामुळे झोप कमी झाली आहे, त्या मुळे संवाद वाढवण्यासह ज्या पूर्वी आपण गोष्टी करत होतो, त्या तशाच करत राहणे गरजेचे आहे. व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायला हवे.
- डॉ. अपर्णा धालमे, मानसोपचार तज्ज्ञ, बारामती. 

भीती बाळगू नका...
कोरोनाच्या काळात बातम्या आणि अनेकांच्या मृत्यूने भीतीची भावना तयार झाली. सर्वात अगोदर भीती दूर करा, काळजी जरुर घ्या पण भीती नको. मानसिक संतुलन कायम राहिल अशा गोष्टी करा, तणाव घेऊ नका.
- डॉ. संताजी शेळके, मानसोपचार तज्ज्ञ, बारामती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona and lockdown have caused depression in youths as well as women