काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 28 November 2020

- लाखो विद्यार्थ्यांची गोपनिय काम येथून चालते.
- गैरप्रकार आणि गोंधळ होण्याची शक्यता 
- परीक्षा विभागाने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला असला तरी अजून कार्यवाही झालेली नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात, रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी आणि रेकाॅर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागा बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील विभाग आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांमधील सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यामध्ये पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी सूचना महाविद्यालयांना देणे, निकाल लागल्यानंतर निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवीप्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वाॅर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली, पण तेथे देखील सीसीटीव्ही नव्हते. 

महत्त्वाची बातमी: दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन होणार? तज्ज्ञांची खलबतं सुरू​

परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना काम होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासंतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 

परीक्षा विभागातील गोपनिय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारतीमध्ये सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे, पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. 

स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तरीनंतरही मिळेना हक्काचा रस्ता; आजारी माणसांना न्यावं लागतंय झोळीतून

...तर घटना टळली असती
परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षा रक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले, त्याला कोंबडा करायला लावला. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली, पण सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यामध्ये कैद झाला असता. तसेच सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाण देखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले. 

"परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील आहे व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is not a single CCTV in exam department of Savitribai Phule Pune University