
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्न समारंभांना मोठी गर्दी होऊ लागल्याने 'सकाळ'ने या समस्येचे सविस्तर वृत्तांकन शुक्रवारी केले.
केडगाव (पुणे) : 'दै.सकाळ'च्या 'लग्नातील वाढती गर्दी चिंताजनक अन् धोकादायक' या बातमीनंतर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने लग्न आणि इतर समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असा आदेश शुक्रवारी (ता.२७) काढला. या निर्णयाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्न समारंभांना मोठी गर्दी होऊ लागल्याने 'सकाळ'ने या समस्येचे सविस्तर वृत्तांकन शुक्रवारी केले. या वार्तांकनाचे जिल्ह्यात चांगले पडसाद उमटले. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने या वार्तांकनाची दखल घेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आदेश जारी केला.
- बारामतीकरांनो, जरा जपून! कोरोना वाढतोय
आदेशात म्हटले की, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रूग्णांची संख्या वाढत आहे. लग्न समारंभ आणि घरगुती कार्यक्रमांमध्ये ५० पेक्षा जास्त लोकांनी सहभागी होऊ नये. हॉटेल व्यावसायिक आणि मंगल कार्यालय व्यवसायिकांनी आदेशामध्ये दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करावे. लग्न तसेच इतर समारंभासाठी कार्यालयात येणाऱ्या लोकांची यादी संबंधित व्यवसायिकांनी स्वतःकडे ठेवावी, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत, बेकायदा जमाव जमवून कायद्याचे उल्लंघन करू नये, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या कार्यालयाने हा आदेश पारित केला आहे.
- महत्त्वाची बातमी: दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन होणार? तज्ज्ञांची खलबतं सुरू
याबाबत यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले, कोरोनाबाबतचे निर्बंध उठल्यानंतर कोरोना संपल्यासारखे लोक वागत आहेत. सरकारने काही सवलती दिलेल्या आहेत मात्र कोरोनाने कोणालाही सवलत दिलेली नाही. सरकारने दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे. लग्न समारंभात बेकायदा गर्दी जमवली तर संबंधित वरबापांवर व मंगल कार्यालय मालकांवर कारवाई केली जाईल. यात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.
- लग्न किंवा घरगुती कार्यक्रम करताय? जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील नवी नियामवली
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे म्हणाले, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. लस अजूनही बाजारात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भान ठेऊन वागायला पाहिजे. लग्न किंवा अन्य समारंभात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचा वापर काटेकोरपणे पाळला पाहिजे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)