पुणे जिल्ह्यात कोरोनावर मोफत उपचाराचा लाभ मिळेना

Corona-patient
Corona-patient

पुणे - केवळ पैशांअभावी एकही व्यक्ती कोरोनाच्या उपचारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राज्य सरकारने कोरोनासाठी सरसकट सर्व व्यक्तींसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. यानुसार प्रत्येक गरजू व्यक्तीला कमाल दीड लाख रुपयांपर्यंत कोरोनावरील मोफत उपचार मिळणे अपेक्षित आहे. यासाठी जिल्हानिहाय खासगी रुग्णालयांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील संबंधित रुग्णालये ही गरीब रुग्णांकडूनही भरमसाट रकमेची देयके वसूल करू लागली आहेत. यामुळे गरीब कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली आहे. या वृत्ताला आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यातील दोन-चार रुग्णालयांचा अपवाद वगळता, अन्य रुग्णालयांनी 25 टक्के रुग्णांवरसुद्धा या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि गरिबांना हक्काच्या योजनेपासून दूर
ठेवत, त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बुट्टे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारने प्रचलित महात्मा फुले जनआरोग्य योजना ही फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू केली आहे. या योजनेतील तरतुदीनुसार अशा कुटुंबांतील व्यक्तींवर दुर्धर आजारात दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. मात्र कोरोनासाठी प्रत्येक कुटुंबाऐवजी प्रत्येक व्यक्तीला कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याची तरतूद केलेली आहे.

या योजनेंतर्गत पुणे शहरातील 16, पिंपरी चिंचवडमधील आठ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 28 अशा एकूण 52 रुग्णालयांत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. यापैकी केवळ एका रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. उर्वरित 51 पैकी सहा रुग्णालयांनी 50 टक्के, आठ रुग्णालयांनी 25 टक्‍क्‍यांहून रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. उर्वरित 30 रुग्णालये 25 टक्‍क्‍यांच्या आत आहेत.

सात रुग्णालयांत शून्य टक्के
दरम्यान, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून सात रुग्णालयांनी एकाही रुग्णांवर मोफत उपचार केले नसल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच रुग्णालयांचा समावेश आहे. याशिवाय सात रुग्णालयांनी 2 टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णांवर उपचार केले आहेत.

झेडपीत कारवाईचा ठराव
दरम्यान, हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आले. गरिबांना मोफत उपचारापासून रोखणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची रुग्णालयनिहाय चौकशी करावी आणि दोषी रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी ठराव मांडला. त्यास ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

क्षेत्रनिहाय रुग्णालये, दाखल रुग्ण, मोफत उपचार रुग्ण
1) पुणे शहर

- एकूण रुग्णालये --- 16
- एकूण दाखल कोरोना रुग्ण --- 26 हजार 663.
- मोफत उपचार झालेले एकूण रुग्ण --- 4 हजार 759.

2) पिंपरी चिंचवड
- एकूण रुग्णालये --- 8
- एकूण दाखल कोरोना रुग्ण --- 14 हजार 765.
- मोफत उपचार झालेले एकूण रुग्ण --- 3 हजार 820.

3) ग्रामीण जिल्हा
- एकूण रुग्णालये --- 28
- एकूण दाखल कोरोना रुग्ण --- 10 हजार 945.
- मोफत उपचार झालेले एकूण रुग्ण --- 1 हजार 819.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com