आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे सापडला कोरोना रुग्ण

अरुण सरोदे
शुक्रवार, 22 मे 2020

- ताप येत असल्याने टॅक्सी ड्रायव्हर मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल

शिनोली : आंबेगाव तालुक्यात शिनोली येथे मुंबईहून टॅक्सी ड्रायव्हर पत्नी दोन मुले व मावशीसह शनिवार (ता.16) रोजी आले होते. ताप येत असल्याने टॅक्सी ड्रायव्हर (वय 49) रविवार (ता. 17) रोजी मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय तपासणीसाठी नायडू हॉस्पिटल पुणे येथे पाठविले. त्याचा अहवाल गुरुवार (ता. 21) रात्री पॉझिटिव्ह आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारपासूनच संपूर्ण गाव बंद करण्यात आले होते. गावातील सर्व रस्ते मंगळवारपासून बंद करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मुंबई व पुणे येथून मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवार रोजी मुंबईहून स्वत:च्या मालकीच्या टॅक्सीने पत्नी दोन मुलांसह गावी आले होते. त्यानंतर सदर कुटुंब स्वत:च्या घरात क्वारंटाईन होते. यावेळी त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी केली होती. आरोग्य विभागातील आशा वर्करने त्यांच्या घरी जाऊन सर्व माहिती घेतली होती.

सदर व्यक्तीला ताप असल्याने रविवारी ते मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनतर त्यांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथे पाठविण्यात आले होते. गुरुवार (ता. 21) रोजी सायंकाळी त्यांचा आहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. सदर व्यक्तीला पुणे येथे पाठविल्यानंतर त्याच्या घरातील मुंबईहून आलेल्या सर्वांना गावातील व शेताकडील घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
    
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात यापूर्वीच उपाययोजना सुरु केल्या आहेत. रात्री प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. मुंबईहून आलेल्या आणखी एका कुटुंबातील संशयित रुग्ण तरुणास बुधवार (ता. 20) रोजी वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट अद्याप आलेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected patients found in Shinoli