भीमनगरमध्ये कोरोनाला रोखण्यात यश; नागरिकांना मोठा दिलासा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भीमनगर येथील ५५० कोरोनाबाधितांपैकी सध्या ४ ते ५ रुग्ण सध्या उपचार घेत असून बाकी घरी परतले आहेत.

घोरपडी (पुणे) : भीमनगर झोपडपट्टी येथे कोरोनाने गेल्या महिनाभरात उच्छाद मांडला होता. प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे आणि नागरिकांनी सूचनांचे योग्य पालन केल्याने भीमनगरमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भीमनगर झोपडपट्टीमध्ये एकूण १२०० घरे असून अंदाजे पाच हजार नागरिक इथे राहतात. आतापर्यंत या वस्तीत ५५० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या वस्तीतील ४ ते ५ उपचार घेत असून बाकी सर्व बरे होऊ घरी परत आले आहेत. या ठिकाणी २० जून रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढू लागली.

एका दिवसात ३०-४० रुग्ण सापडत होते. ७ जुलैपर्यंत दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूसह बाधितांची संख्या ४९६ पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या घटू लागली. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा दहाच्या आत आला आहे. 

जुन्या पालखी मार्गाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे वाहन चालवणे झाले जिकीरीचे!​

या झोपडपट्टीमध्ये दैनंदिन औषध फवारणी, सार्वजनिक शौचालयामध्ये वारंवार स्वच्छता आणि औषध फवारणी अशा उपाययोजना करण्यात आल्या. तसेच परिसरातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या. वस्तीतील वयस्कर नागरिक आणि इतर आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना योग्य आणि वेळेवर औषधोपचार दिले. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली आहे. सोबतच पालिकेने प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. तसेच परिसरात काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे आणि आयुर्वेदिक काढा याचे वाटप केले.

धक्कादायक : पुण्याचं हवामान होतंय‘एक्स्ट्रीम’; ऊन, पाऊस, थंडी सगळंच होतंय अती​

भीमनगर येथील ५५० कोरोनाबाधितांपैकी सध्या ४ ते ५ रुग्ण सध्या उपचार घेत असून बाकी घरी परतले आहेत. येथील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, आरोग्य निरीक्षक, राजकीय कार्यकर्ते, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, मुकादम आणि सफाई कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या सर्वांच्या सहकार्यामुळे येथील रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे.
- दयानंद सोनकांबळे, सहआयुक्त,  ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय

जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत होते. मनपा अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना केल्या. त्याला नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिला. यामुळे आता भीमनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्याने इथल्या अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यासाठी सरकारने काही उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
- प्रशांत म्हस्के, माजी नगरसेवक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection has been in controlled in Bhimnagar slum area