जुन्या पालखी मार्गाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे वाहन चालवणे झाले जिकीरीचे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जुन्या पालखी मार्गाचे २०१७ मध्ये खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.

हडपसर : वानवडी-महंमदवाडी या जुन्या ऐतिहासिक रस्त्याचे काम रखडले असून हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रभाग क्र. २४ आणि २६ मधून हा रस्ता जात असून तो २४ मीटर इतका रूंद आहे. हा रस्ता सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतून जात आहे. या विभागाने महापालिकेला ताबा न दिल्याने २०० मीटर लांब रस्त्याचे काम रखडले आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वानवडी आणि महंमदवाडी या दोन भागांना जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 

नागरिक संजय जगताप म्हणाले, जुन्या पालखी मार्गाचे २०१७ मध्ये खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. वानवडी ते वडकी दरम्यान जुना पालखी मार्ग आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून आराखडा तयार करून केंद्र शासनाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. वानवडी ते वडकी या दरम्यानच्या या मार्गाचे काम लवकर झाल्यास, सोलापूर आणि सासवड रस्त्याला पर्यायी मार्ग उपल्बध होऊ शकेल. 

धक्कादायक : पुण्याचं हवामान होतंय‘एक्स्ट्रीम’; ऊन, पाऊस, थंडी सगळंच होतंय अती​

याबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे म्हणाले, ''हा रस्ता माझ्या हद्दीत येत नाही. तरी देखील या रस्त्याच्या कामासाठी मी निधी उपल्बध करून दिला आहे. महंमदवाडी हद्दीतील उर्वरीत रस्त्याचे काम लॅाकडाउनमुळे थांबले आहे. ते आठ दिवसात सुरू होईल.''

प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक आनंद अलकुंटे म्हणाले, ''पालखी मार्ग सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतून २०० मीटर लांब इतका जात आहे. या विभागाने त्यांच्या हद्दीतील जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.''

एसटी कामगारांसाठी अजितदादा आलेत धावून...​

महापालिकेच्या पथ विभागाचे अभियंता श्रमिक शेवते म्हणाले, ''या मार्गावर एक नैसर्गिक ओढा आहे. त्यावर कलवड बांधण्यासाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. कलवडचे काम पूर्ण झाल्यानंतर महंमदवाडीच्या बाजूच्या उर्वरीत रस्त्याचे काम तातडीने करण्यात येणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on the old Wanwadi Mohammadwadi road is stalled