esakal | धक्कादायक! नारायणगावात होम क्वारंटाइन रुग्ण फिरताहेत मोकाट
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection

धक्कादायक! नारायणगावात होम क्वारंटाइन रुग्ण फिरताहेत मोकाट

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील तेरा गावात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत सौम्य लक्षणे असलेले होम क्वारनटाईन रुग्ण नियमांचे पालन न करता मोकाट फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक तीव्र होत आहे. अरेरावी करणाऱ्या होम क्वारनटाईन रुग्णांना कोण आवरणार असा प्रश्न वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर , वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

जुन्नर तालुक्यातील लोकसंख्या जास्त असलेली नारायणगाव, वारुळवाडी ही गावे हॉटस्पॉट झाली आहेत. वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नारायणगाव, वारूळवाडी,मांजरवाडी , धालेवाडी, धनगरवाडी, आर्वी, हिवरे बुद्रुक , ओझर क्र.१ व २, भोरवाडी , येडगाव, खोडद , हिवरे तर्फे नारायणगाव या तेरा गावात रोज सुमारे चाळीस रुग्ण आढळुन येत आहेत. आज अखेर या तेरा गावात २ हजार ५५१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी २ हजार १७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २९५ रुग्ण कोरोना बाधित असून या पैकी सौम्य लक्षणे असलेले ९४ रुग्ण होम क्वारनटाईन आहेत. सौम्य लक्षणे असलेले १३३ रूग्ण लेण्याद्री कोविड केंद्रात तर तीव्र लक्षणे असलेले सुमारे ७० रुग्ण विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा: भिगवण : अनअधिकृत कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांचा ऐवज जप्त

रोज रुग्ण संख्या वाढत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. बेड मिळाला तर ऑक्सिजन, प्लाझ्मा , रेमीडिसिव्हर टंचाई मुळे नातेवाईकांची धावपळ वाढली असून उपचार करणारे डॉक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने आर्वी येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील चार दिवसांत तालुक्यात अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४० ते ५० वयोगटातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाची लाट तीव्र होत असताना होम क्वारनटाईन असलेले रुग्ण मोकाट फिरत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांची डोकेदुखी वाढली आहे.

वारंवार सूचना करून सुद्धा होम क्वारनटाईन रुग्ण दूध , किराणा खरेदीचा बहाणा करून फिरत असतात. होम क्वारनटाईन रुग्णांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांना होम क्वारनटाईन रुग्ण अरेरावी करतात.-राजेंद्र मेहेर, सरपंच : ग्रामपंचायत वारूळवाडी.

कोविड उपचार केंद्रात आठ दिवस उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनी पुढील सात दिवस घरी विलगीकरण रहाणे आवश्यक आहे. तसेच होम क्वारनटाईन रुग्णांनी घरीच विलग राहून उपचार घेणे बंधनकारक आहे. मात्र होम क्वारंनटाईन असलेले व कोविड उपचार केंद्रातुन सोडलेले रुग्ण फिरत असताना दिसतात. या रुग्णामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्र दिवस कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत. मात्र कोरोना संसर्ग झालेला व लक्षणे नसलेला तरुण वर्ग फिरत असून संसर्ग वाढवत आहे. या साठी कडक उपाय योजना करणे आवश्यक आहे.-डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी, वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र.

हेही वाचा: माजी मंत्री शिवतारेंचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा