आळंदीत 'हे' काय सुरू आहे; कसा थांबणार कोराेना

विलास काटे
Wednesday, 16 September 2020

आळंदीत कोरोनाची संख्या वाढत असताना पिंपरी पुण्यातील मृत नागरिकांच्या अस्थी इंद्रायणी नदीत विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर आणल्या जात आहे.

आळंदी : आळंदीत कोरोनाची संख्या वाढत असताना पिंपरी पुण्यातील मृत नागरिकांच्या अस्थी इंद्रायणी नदीत विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर आणल्या जात आहे. विशेष म्हणजे दशक्रिया विधीही आळंदीत होत असून सकाळी सहापासून दुपारी चार वाजेपर्यंत इंद्रायणी तिरी भक्त पुंडलिक मंदिराजवळ मृतांच्या नातेवाईकांची गर्दी होते. कोणतीही काळवेळ पाळले जात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आळंदीत वाढणा-या रूग्णसंख्येवर आळा बसवायचा असेल तर आळंदी बाहेरून येणा-या अस्थी विसर्जनावर बंदी आणण्याची मागणी आळंदीकर करत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला.आळंदीतही रोज दहा विस रूग्ण आढळत आहेत. दोन महिन्यांवर कार्तिकी वारी येवून ठेपल्याने प्रशासनापुढे कोरोना आटोक्यात आणण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक पालिका आणि तालुकास्तरिय महसूल प्रशासन अनेक प्रयत्न कोरोना रोखण्यासाठी करत आहेत. मात्र आळंदीतील काही लोक कोरोनाबाबत विषेष काळजी न घेता केवळ आर्थिक प्राप्तीसाठी काहीही करण्यास तयार होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता  आळंदीत इंद्रायणी तिरी अस्थीविसर्जनाचे कार्यक्रम सुरू आहेत.

तसेच पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका हद्दीतील अनेक मृतांचे अस्थि विसर्जन आळंदीत केले जात आहे. विशेष म्हणजे बाहेर गावच्या लोकांचे दशक्रिया विधीही आळंदीतील घाटावर केले जात आहे. यावर पालिका, पोलिस कोणतीच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.

वास्तविक पुंडलिक मंदिराजवळील घाटावर आणि शनि मंदिरालगत मोठ्या प्रमाणावर मृतांच्या नातेवाईकांची गर्दी असते. सकाळी सहा वाजल्यापासून अस्थी विसर्जनासाठी गर्दी होते. वास्तविक दो चार घरांचे आर्थिक कमाई या अस्थी विसर्जनावर चालते. दिवसभरात हजारोंच्या घरात पैसे मिळत आहेत. यामुळे अस्थी विसर्जनाचे विधी करणा-यांना शहरात काय चालले याची चिंता नाही.

तसेच अस्थी विसर्जन केल्यावर नाष्टा,जेवणासाठी शहरातील अन्य ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी आलेले मृतांचे नातेवाईक फिरत असल्याने संसर्गाची बाधा अधिक होण्याचा प्रकार होत आहे.मात्र पालिका प्रशासन सोयिस्कर डोळझाक करत आहे. 
आळंदीत रूग्णांना उपचारासाठी अठरा किलोमीटर दूर महाळूंगे, चांडोली आणि पिपरीतील वायसीएम रूग्णालयात जावे लागते. दुस-याच्या चुकांमुळे आळंदीकरांचा जीव धोक्यात आहे.

वास्तविक पुणे पिंपरीतील लोकांनीही अस्थी विसर्जनासाठी आळंदीत न आलेलेच बरे. मात्र तरिही धार्मिक कार्याच्या नावाखाली लोक आळंदीत धाव घेत आहेत. कोरोना रोखायचा असल्यास बाहेरिल लोकांच्या अस्थीविसर्जनावर बंदी आणण्याची मागणी आळंदीकर करत आहेत. 

याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले,खरे तर गंभिर बाब आहे. प्रांत अधिका-यांशी  आळंदी शहर वगळता इतरांच्या अस्थि विसर्जनावरिल बंदीबाबत आज चर्चा करून तशा आशयाचा आदेश काढला जाईल. याबाबत प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले की,आज याबाबत मुख्याधिकारी आणि इतर आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावली आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection is on the rise in Alandi