पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची अक्षरश: आर्थिक लूट केली जाऊ लागली आहे. यासाठी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करू लागली आहेत. कोरोना उपचारांसाठी सरकारने निश्‍चित करून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल देण्यात येऊ लागले आहे. जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या या बिलांच्या लेखापरीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. या लेखापरीक्षणामुळे विविध रुग्णालयांनी मिळून तब्बल ७७ लाख ९२ हजार १११ रुपये जादा बिल आकारल्याचे निदर्शनास आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेने हे जादा बिल तत्काळ रद्द केले आहे. शिवाय, ज्या रुग्णांकडून नियमांपेक्षा अधिक बिल घेण्यात आले होते, ते बिल संबंधित रुग्णांना परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३५ रुग्णांना फायदा होणार आहे. या एकूण रुग्णांमध्ये मागील आठवड्यातील १२४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. यापैकी डीसीएचसी आणि डीसीएचमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेले आहेत. प्रत्यक्षात या निश्‍चित दरांहून अधिक दराने बिलांची आकारणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी चार डीसीएच आणि सहा डीसीएचसी रुग्णालये कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. 

या सर्व रुग्णालयांनी आकारणी केलेल्या बिलांची पडताळणी करण्याचा आदेश पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी २० जुलै २०२० ला दिला होता. या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्येकी दोन सदस्यीय दहा लेखापरीक्षण पथकांची स्थापना केली होती. या पथकांनी संबंधित रुग्णालयांना भेट देऊन प्रत्येक रुग्णनिहाय आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी केली. लेखापरीक्षण पथकांकडून तपासणी करण्यात आलेली बिले ही १ ऑगस्ट ते १६ ऑक्‍टोबर २०२० या अडीच महिन्यांच्या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३५ रुग्णांना मिळून विविध रुग्णालयांनी एकूण ३ कोटी ८३ लाख ६१ हजार ७५ रुपयांचे बिल आकारले होते.

बिलांची पडताळणी करण्यासाठी लेखापरीक्षण पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी १ ऑगस्टपासून आजअखेरपर्यंतच्या सर्व बिलांची पडताळणी केली आहे. त्या पडताळणीत सुमारे ७८ लाखांची जादा आकारणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे जादा बिल संबंधित रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

शुल्काचे लेखापरीक्षण
१० - कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या
८३५ - बिलांची तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या 
३,८३,६१,०७५ - सर्व रुग्णांसाठी आकारलेल्या बिलांची एकूण रक्कम 
७७,९२,१११ - लेखापरीक्षणात आढळून आलेली जादा रक्कम 
३,०५,६८,९६४ - बिल कमी केल्यानंतरची बिलांची रक्कम

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com