
पुणे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा व पिंपळसुटी येथील दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच, कोरोनामुक्त झालेल्या रांजणगाव गणपती येथे आज पुन्हा तीन स्थानिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा येथील ६५ वर्षीय माजी सरपंचांचा सोमवारी (ता. २0) कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर, पिंपळसुटी येथील ३० वर्षीय वकील तरुणाचा कोरोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला होता. माजी सरपंचांच्या घरातील पाच जण पॉझिटिव्ह आले, तर त्यांच्याच संपर्कात आलेल्या येथील खासगी रुग्णालयातील एक ३० वर्षीय कर्मचारी ही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, पिंपळसुटी येथील तरुण वकिलाच्या कुटुंबातील चार सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहीती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते- इसवे यांनी दिली.
मांडवगण फराटा येथील रुग्णाच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, मुलगा, सून, एक नातू व एक नात आणि खासगी दवाखान्यातील कर्मचारी, असे सहा, तर पिंपळसुटी येथील तरुण वकिलाच्या संपर्कातील आई, भाऊ, पुतणी, बहीण या चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात करोना रुग्णाची संख्या आता १४ झाली आहे. यात मांडवगण फराटा येथील ७, गणेगाव दुमाला १, पिंपळसुटी ५, नागरगाव १, अशा १४ रुग्णांचा यात समावेश आहे. शिरूरच्या पूर्व भागात आतापर्यंत तब्बल १८ रुग्ण सापडले असून, त्यातील ४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून अनेक ड्रायव्हर, शेतकरी हे आपला शेतीमाल पुणे, मुंबई, नगर आदी ठिकाणी नेत असतात. त्याचबरोबर या परिसरातून रांजणगाव एमआयडीसी भागातही कामासाठी अनेक तरुण ये-जा करत असतात. अशा व्यक्तींनी बाहेरून आल्यानंतर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्ती कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आल्या असतील, त्यांनी पुढे येत प्रशासनाला माहिती देत सहकार्य करावे. त्याचबरोबर परिसरातील कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप सदृश्य लक्षणे दिसत असतील, त्यांनी ताबडतोब येथील आरोग्य विभागाला कळविणे गरजेचे आहे, असे डॉ. मंजुषा सातपुते - इसवे यांनी सांगितले आहे.
तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) गाव नुकतेच कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. मात्र, आज पुन्हा तीन स्थानिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेकर यांनी सांगितली. यापूर्वीचे गावातील सर्व 13 रुग्ण दवाखान्यातील उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात करून बरे होऊन घरी आले आहेत. मात्र, आता तीन नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन व ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
रांजणगाव परिसरात आढळलेले कोरोना रुग्ण बहुतांश कंपनी कामगार असून, एमआयडीसीतूनच कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती पुढे आली आहेत. जिल्हा व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, कंटेन्मेंट झोनमधून बरेच कामगार दररोज एमआयडीसीत ये- जा करीत आहेत. विशेषतः पुणे परिसरातून मोठे अधिकारी व काही कामगार मोठ्या प्रमाणात येत असून, कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे नियम पाळून कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.