पुण्यात रविवारी वाढले कोरोना रुग्ण

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 22 February 2021

शहरात दिवसभरात २९४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १६४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

पुणे - पुण्यात कोरोनाला थोपविण्याकरिता नव्याने काही उपाय आखले असतानाच रविवारी पुन्हा या आजाराचे रुग्ण वाढून तो आकडा सुमारे साडेसहाशेच्या घरात गेला. गंभीर म्हणजे, गेल्या चार-साडेचार महिन्यांत पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी सर्वाधिक ६३४ रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणांनाही अवाक झाल्या आहेत. वातावरणातील सततच्या बदलांमुळे श्वसनाचे त्रास वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. दिवसभरात ४ हजार ७०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 

शहरात दिवसभरात २९४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १६४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या अहवालात स्पष्ट केले आहे. नव्या रुग्णांसोबतच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ८९६ इतकी झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आतापर्यंत ४ हजार ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

आकडेवारीवरून वाढली चिंता 
हडपसर-मुंढवा परिसरात रविवारी सर्वाधिक ८५ रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ वारजे-कर्वेनगर भागात ६७ रुग्णांची नोंद आहे. त्यानंतर मात्र कसबा-विश्रामबागच्या हद्दीत ५७, वडगावशेरी-नगररस्ता परिसरात ५४ आणि कोथरूडमध्ये ५२ रुग्ण आढळून आले आहेत. या भागांत रोज रुग्ण वाढत असल्याचे नव्या आकडेवारीवरून दिसत आहे. 

वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने श्‍वसनाचा त्रास जाणवतो. अशा लोकांना कोरोनाचा धोका असू शकतो. त्यामुळे श्‍वसनाचा त्रास जाणवणाऱ्यांनी चाचणीला प्राधान्य द्यायला हवेच. सध्याच्या वातावरणात वैयक्तिक पातळीवर खूप काळजी घेण्याची गरज आहे. 
डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण अधिकारी, महापालिका 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients increased in Pune on Sunday