धक्कादायक! पुण्यात कोरोना रुग्ण, संशयितांचा प्रायव्हेड डेटा होतोय 'लिक'!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

कोरोनाचे संशयित रुग्ण चाचणी केंद्रात गेल्यावर त्यांचे वैयक्तीक तपशील नोंदवून घेण्यात येतात. मात्र, हे तपशील काही औषध कंपन्या, अन्य चाचणी केंद्रांना उपलब्ध होत आहेत.

पुणे : कोरोना निदानासाठी स्वॅब तपासणी केंद्रात गेलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा खासगी तपासणी केंद्र, औषध कंपन्यांनी घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी महापालिकेकडे होऊ लागली आहे. दरम्यान, रुग्णांचे किंवा संशयितांचे वैयक्तिक तपशील कोणालाही देऊ नये, अशी समज खासगी तपासणी केंद्राना देण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे संशयित रुग्ण चाचणी केंद्रात गेल्यावर त्यांचे वैयक्तीक तपशील नोंदवून घेण्यात येतात. मात्र, हे तपशील काही औषध कंपन्या, अन्य चाचणी केंद्रांना उपलब्ध होत आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांना "सवलतीच्या दरात कोरोनाची घरपोच चाचणी करून मिळेल', "औषध स्वस्तात मिळेल,' अशा आशयाचे मेसेज येऊ लागले आहेत. तसेच ज्यांना कोरोना झालेला नाही, त्यांनाही हे मेसेज येऊ लागले आहेत. त्यामुळे संशयितांचे मोबाईल क्रमांक संबंधितांकडे पोचले कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

या बाबत क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. महापालिकेला त्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "रुग्णांचे वैयक्तीक तपशील लिक होणे, ही गंभीर बाब आहे. तसेच संशयितांचीही माहिती खासगी चाचणी केंद्रांपर्यंत पोचते कशी? त्या बाबत त्यांच्यावर बंधने घातली गेली पाहिजे. खासगी चाचणी केंद्रांत चाचणी केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती महापालिकेला काही वेळा तीन दिवसांनंतर मिळते. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा पुढील कामकाजाला सुरवात करते. प्रत्यक्षात ज्या क्षणी रुग्ण पॉझिटिव्ह आढळतो तेव्हाच महापालिकेला कळविणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, "शहरात आत्तापर्यंत सुमारे साडेसहा लाख नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 3 लाख नागरिकांच्या चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या आहेत. महापालिकेच्या केंद्रांत झालेल्या चाचण्यांमधील संशयितांचे तपशील बाहेर जात नाहीत. मात्र, खासगी चाचणी केंद्रांबाबत तपासणी करावी लागेल. रुग्णांची माहिती बाहेर जात असेल तर, ती गंभीर बाब आहे. संशयितांचे तपशील बाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे खासगी चाचणी केंद्रांना कळविण्यात येईल.' तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती तातडीने देण्यात यावी, याचीही त्यांना जाणीव करून देण्यात येईल. अन्यथा महापालिका त्यांच्या विरुद्ध कारवाई करेल, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.''

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients private data leaked in Pune