अवघड झालं...पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळेना...

जनार्दन दांडगे
गुरुवार, 9 जुलै 2020

संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेड उपलब्ध होईल व रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येईल, या आशेवर तो मागिल 25 तासांपासून घरातच बसून आहे.

लोणी काळभोर (पुणे) : उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून सर्दी खोकल्याने हैराण झालेल्या एका पस्तीस वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घरी पाठवून दिल्याचा धक्कादायक प्रकार कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे गुरुवारी (ता. ९) झाला आहे. 

पुणेकरांच्या बेशिस्तीचे घडले दर्शन

संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा आळंदी म्हातोबाची येथील रहिवाशी असून, बेड उपलब्ध होईल व रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येईल, या आशेवर तो मागिल 25 तासांपासून घरातच बसून आहे.  त्याच्याबरोबरच कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळमळा परिसरातील आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट मिळूनही उपचारासाठी बेड उपलब्ध दोत नसल्याने घरातच बसले असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. 

वाळूमाफियांकडून महिला तहसीलदारांवर पाळत

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी हवेली तालुक्यामधील बारा खासगी रुग्णालयातील सतराशे बेड अधिग्रहीत केल्याचा दावा करणारे प्रशासन या तीन रुग्णांमुळे तोंडघशी पडले आहे. त्यांना उपचारासाठी कोणी बेड देता बेड, असे म्हणण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली आहे. जिल्हा परिषदेच्या कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डाॅ. मेहबूब लकडे यांनी उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने आळंदी म्हातोबाची येथील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला घरी पाठवून दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

आळंदी म्हातोबाची येथील एका पस्तीस वर्षीय तरुणास मंगळवारी (ता. ७) सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्यास कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. त्यास होत असलेल्या त्रासावरून कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्याचा स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पाठवला होता. या तपासणीत तो कोरोनाबाधित असल्याचे बुधवारी चार वाजण्याच्या समारास स्पष्ठ झाले. त्याला सर्दी- खोकल्याचा त्रास व तो कोरोनाबाधित असल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी बेड नसल्याचे कारण पुढे करत त्याला घरी पाठवून दिले होते.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

याबाबत आरोग्य अधिकारी लकडे यांनी सांगितले की, आळंदी म्हातोबाची येथील कोरोनाबाधित रुग्णास बुधवारी (ता. ८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरी पाठवून दिले, ही बाब खरी आहे. त्यास बेड मिळावा, यासाठी मागिल चोविस तासापासून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, बेडच उपलब्ध होत नाही. आमचा नाईलाज आहे. धुमाळमळा परिसरातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना जादा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटांइन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

६५ रुग्णांवर घरीच उपचार 
कुंजीरवाडी येथील प्रकारबद्दल जिल्हा परीषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले की, सध्या हवेली तालुक्यात बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळून येत नसल्यास घरीच ठेवण्याचे शासनाचेच आदेश आहेत. आळंदी म्हातोबाची येथील रुग्णाला तत्काळ बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे. जिल्ह्यात ६५ रुग्णांवर घरीच उपचार चालू केले आहेत.   

Edited By : Nilesh Shende
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients in Pune district could not get a place in the hospital