लय भारी...शिवरीकरांच्या खड्या पहाऱ्याने कोरोना पळाला कोसो दूर... 

योगेश कामथे
बुधवार, 20 मे 2020

कोरोनाला रोखण्यासाठी शिवरी येथील तरुणांनी पुढाकार घेतला असून, गेल्या दोन महिन्यापासून येथील युवक आपल्या गावची रात्रंदिवस राखण करत आहेत. 

खळद (पुणे) : सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना आपले गाव कोरोनापासून सुरक्षित राहावे, या साठी पुरंदर तालुक्‍यातील शिवरी येथील तरुणांनी पुढाकार घेतला असून, गेल्या दोन महिन्यापासून येथील युवक आपल्या गावची रात्रंदिवस राखण करत आहेत. 

आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

शिवरी येथे आदिमाया आदिशक्ती यमाई देवीचे स्वयंभू मंदिर असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. मात्र, कोरोनोमुळे येथील नागरिकांनी सर्वप्रथम मंदिर दर्शनासाठी बंद केले. गावची यात्राही रद्द केली. पुरंदर तालुक्‍यातील वीर- परिंचे परिसराला जाण्यासाठी शिवरी गावाच्या मध्यवर्ती भागातूनच राज्य महामार्ग क्रमांक 120 गेला आहे; तर दुसऱ्या बाजूने पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे अनेक नागरिक या रस्त्यांचा वापर करतात. त्यामुळे चुकूनही आपल्या गावाला धोका होऊ नये, यासाठी येथील आपत्ती व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ यांनी चेक पोस्ट केले असून, रात्रंदिवस युवक या ठिकाणी आळीपाळीने बसून पहारा देत आहेत. आलेल्या सर्व नागरिकांची, वाहनांची तपासणी करणे व निर्जंतुकीकरण करण्याचे काम केले जाते. 

मुळशीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची भीती

सध्या पुणे व मुंबई या ठिकाणाहून अनेक नागरिक गावात येत असून, त्यांची महात्मा जोतिराव फुले विद्यालय या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे; तर ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा व्यक्तींना गावच्या नियंत्रणाखाली क्वारंटाइन केले आहे. या सर्व नागरिकांची रोजच्यारोज तपासणी करण्याचे काम व परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून केले जाते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या समितीमध्ये पोलिस पाटील नवनाथ लिंभोरे, ग्रामसेविका ताई गायकवाड, तलाठी बाबू आगे, प्रमोद जगताप, विकास कामथे, तुषार घाडगे, तुकाराम कांबळे, नवनाथ गायकवाड, राजाभाऊ क्षीरसागर, जयश्री खामकर, संजय रोटे, सविता टेकवडे, मनीषा आरडे, अंकुश कामथे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona ran away as the villagers at Shivri were on guard