वेल्ह्यातील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह, मात्र 17 जणांचे... 

corona
corona

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील वडगाव झांजे परिसरातील 19 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल आज (ता. 15) निगेटिव्ह आले आहेत; तर अद्याप 17 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती वेल्हे प्रशासनाने दिली. 

वडगाव झांजे परिसरात अवघ्या पाच दिवसात एकूण 10 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आज 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, तरी 17 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याने धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून, या ठिकाणी नियमित तपासणी सुरू आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये, याची काळजी घेत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. 

या परिसरात वेल्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोवीस तास बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातील गावांमध्ये आरोग्य कर्मचारी ठाण मांडून बसले असून, घराघरांतील लोकांची तपासणी सुरू असून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शिक्के मारून गृह विलगीकरण करून वैद्यकीय निगराणीखाली ठेवले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन मालाजुरे यांनी दिली. परिसरातील गावामध्ये सोडिअम क्‍लोराईडची फवारणी नियमित केली जात असल्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी सांगितले. 

वडगाव झांजे परिसरात 9 मे रोजी एका 38 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली. त्यानंतर 14 मेपर्यंत एकूण 10 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वेल्हे तालुक्‍यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 वर पोचली असून, त्यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, आठ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 10 जणांवर उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिसरातील वडगाव झांजे केंद्रस्थानी मानून तीन किलोमीटर परिसरामधील सुरवड, सोंडे माथना, सोंडे कार्ला, कोदवडी, सोंडे सरपाले, आसनी दामगुडा, मंजाई आसनी ही गावे बफर क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहेत. परिसरातील गावांमध्ये कोणाला काही लक्षणे आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com