एका लग्नाची गोड गोष्ट...त्यांच्या सप्तपदीमुळे गरजूंना...

marrage
marrage

भोर (पुणे) : लॉकडाउनमुळे भोर येथील नगरसेविकेने आपल्या मुलाचे लग्न केवळ दहा जणांच्या उपस्थितीत लावले. त्यामुळे झालेल्या बचतीतून गरजूंसाठी बोअरवेल काढून दिली. तसेच, शहर व तालुक्‍यातील गरजूंना जिवनावश्‍यक वस्तूंच्या शिधाकीटचे वाटपही केले. 

भोर नगरपालिकेतील कॉंग्रेसच्या नगरसेविका आशा बजरंग शिंदे यांचा मुलगा ओंकार याचे आंबेघर (ता. भोर) येथील ज्योती शिवाजी कोंढाळकर हिच्यासोबत लग्न ठरले. परंतु, लॉकडाउनमुळे लग्न कसे करावे, याचा विचार दोन्ही कुटुंबीयांनी सुरू केला. अखेर दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ मंडळींनी लग्नाच्या तिथीप्रमाणे निर्धारित वेळेत लग्नसमारंभ पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

नगरसेविका असल्यामुळे आशा शिंदे व बजरंग शिंदे यांनी सरकारच्या आदेशानुसार मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून लग्नकार्य करण्याचा निर्धार केला. त्यानुसार संजयनगर येथील खंडोबा मंदिरात दोन्ही कुटुंबातील केवळ दहा जणांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्नसमारंभ उरकला. या वेळी बचत झालेल्या पैशातून 90 हजार रुपये खर्चून शहरातील संजयनगरमधील नागरिकांसाठी बोअरवेल काढून दिली. तसेच, भोर शहर व तालुक्‍यातील 300 गरजूंना शिधाकीटचे वाटप केले. नवदांपत्याच्या हस्ते बोअरवेलच्या पाणी वापराचा प्रारंभ करून बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले.  
 

आशा शिंदे यांनी केलेल्या या उपक्रमाचे आमदार संग्राम थोपटे, नगराध्यक्षा निर्मला आवारे, नगरसेवक सुमंत शेटे, जगदीश किरवे, अमित सागळे, गणेश मोहिते व प्रा. मार्तंड साठे यांनी अभिनंदन केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार संग्राम थोपटे यांच्या सूचनेनुसार आम्ही मुलाच्या लग्नाच्या बचतीच्या खर्चातून संजयनगर परिसरातील नागरिकांना पाण्याची सोय केली. शिवाय लॉकडाउनमुळे कामगार व मजुरांची होणारी उपासमार टाळण्यासाठी जीवनावश्‍यक वस्तूंच्या शिधाकीटचेही वाटप वाटप केले. 
- आशा बजरंग शिंदे, नगरसेविका, भोर 

आवश्‍यकता असलेल्या महिलांना पाण्याची सोय करण्याचे पुण्याचे काम आमच्या लग्नामुळे झाल्याने आणि योग्य व्यक्तींना जीवनावश्‍यक वस्तू दिल्यामुळे लग्नाचा क्षण आमच्या आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. 
- ज्योती व ओंकार शिंदे, नवदांपत्य 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com