esakal | कोरोनाबाधितांनो तुम्ही आता थेट अमेरिकेतील डॉक्टरांचा घ्या मोफत सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

कोरोनाबाधितांनो, थेट अमेरिकेतील डॉक्टरांचा घ्या मोफत सल्ला

sakal_logo
By
योगिराज प्रभुणे -@yogirajprabhune

पुणे - कोरोनाबाधितांनो, तुम्ही आता थेट अमेरिकेतील भारतीय वंशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला सल्ला घेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे हवाय फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन. भारतात कोरोनाचा थैमान सुरू आहे. रोज हजारो नवीन रुग्णांची भर पडत आहे. गेल्या वर्षभरापासून दिवस-रात्र भारतातील डॉक्टर, नर्स कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. या रुग्णांची शुश्रूषा करण्याचं मोठं आव्हान ते सातत्याने पेलत आले आहेत. देशातील डॉक्टरांना आता अमेरिकतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे.

या उपक्रमाबद्दल अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. अभिजीत नाकवे, डॉ. हेमराज गायधनी म्हणाले, “कोरोना हे जागतिक संकट आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. आपली लोकसंख्या मोठी असल्याने कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी भारतातील कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी एक व्यासपीठ तयार केले आहे. त्या अंतर्गत देशातील रुग्णांना त्यांच्या भाषेत कोरोनाबाबत नेमके उपचार सांगितले जातील.”

या उपक्रमासाठी डॉ. अभिजीत नाकवे, डॉ. हेमराज गायधनी, डॅा. निशांत सांगोळे, डॉ. गुप्ता, डॉ. नितीन ठाकरे व मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.

हेही वाचा: पुणे : 24 तासात 11 हजार 661 नवे रुग्ण; 159 जणांचा मृत्यू

मेडिकल रिपोर्ट दाखविता येणार

नवीन तंत्रज्ञानाचा मदतीने कोरोनाबाधितांना अमेरिकेतील डॉक्टरांना भारतीय डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. त्यासाठी www.mdtok.com/org/covid19 हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता आहे. MDtok द्वारे रुग्णांना घरी अथवा रुग्णालयामधून त्यांचे मेडिकल रिपोर्ट थेट अमेरिकेतील डॉक्टरांना दाखवता येतील व सल्ला घेता येईल. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

स्थानिक भाषेतून संवाद

देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून अमेरिकेत वैद्यकीय सेवा करणारे सुमारे ५० हजार डॉक्टर आहेत. त्यांच्यापैकी काही डॉक्टर पहिल्या टप्प्यात या कोरोनाच्या व्यासपीठात सहभागी झाले आहेत. मराठी भाषेतून संवाद साधणारे डॉक्टरही त्यात आहेत. ते रुग्णांशी पूर्ण मराठीतून बोलून वैद्यकीय सल्ला देऊ शकतील.

देशातील नागरिकांना संकटाच्या काळात तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. रुग्णांचा प्रतिसाद मिळाल्यास या सेवेची व्याप्ती वाढविणे शक्य आहे. रुग्णांच्या वाढत्या प्रमाणात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आणखी डॉक्टरांना सहभागी करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- डॉ. अभिजीत नाकवे, अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर

loading image
go to top