धक्कादायक, बारामतीतील कोरोना संशयिताचा रुग्णालयात घेऊन जातानाच मृत्यू 

मिलिंद संगई
Tuesday, 7 July 2020

सदर ज्येष्ठ नागरिकाला गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्रास होत होता. आज शहरातील एका खासगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले होते. मात्र,

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा आज मृत्यू झाला. ते कोरोना संशयित असून, त्यांच्या घशातील द्रावाच्या नमुन्याच्या तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

सदर ज्येष्ठ नागरिकाला गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्रास होत होता. आज शहरातील एका खासगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले होते. मात्र, रुई येथे जाऊन अगोदर तपासणी करण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला. त्यानुसार रुई येथील कोविड हेल्थ केअर सेंटर येथे सदर नागरिकास नेण्यात आले होते. मात्र, येथे कोरोनाचे रुग्ण असतात, त्यामुळे मला येथे राहायचे नाही, पुण्याला घेऊन जा, असा आग्रह सदर नागरिकाने नातेवाईकांकडे धरला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्याला नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालविल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले. 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

दरम्यान, त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आलेले आहेत, मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नसल्याने त्यांना कोरोना संशयित म्हटले जात आहे. या तपासणीचा अहवाल येईपर्यंत सदर नागरिक कोरोनाग्रस्त होता की नाही, हे समजू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

दरम्यान, कोरोना संशयित असल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाच्या मृतदेहावर बारामतीत प्रशासकीय स्तरावरच अंतिम संस्कार होणार आहेत. नातेवाईकांकडे त्यांचे पार्थिव दिले जाणार नसल्याचेही खोमणे यांनी सांगितले. याबाबत आता कोरोनाच्या अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. कोरोना संशयित असल्याने त्यांचे शवविच्छेदनही केले जाणार नाही, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspect dies in Baramati taluka