कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या पुण्यातील लॅबवर कारवाई 

उमेश शेळके
गुरुवार, 9 जुलै 2020

कोरोना चाचणीचा रिपोर्ट चुकीचा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका लॅबवर कारवाई केली आहे. 

पुणे, ता. 9 : सध्या जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, कोरोना चाचणीचा रिपोर्ट चुकीचा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका लॅबवर कारवाई केली आहे. थारोकअर लॅबला आता हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड 19 साठी स्वॅब तपासणी बंद कऱण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या चाचणीचा चुकीचा अहवाल दिल्या प्रकऱणी खासगी लॅबवर पहिल्यांदाच अशी बंदीची कारवाई करण्यात आली आहे. खानापूर इथल्या एका कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यातील दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालाबाबत कुटुंबाने संशय व्यक्त केला होता. त्यांचे नमुने पुन्हा एनआयव्ही पुणे इथं तपासणीसाठी पाठवले. तेव्हा कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचं समोर आलं. 

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथ रोग नियंत्रण कायदा 1897 व केंद्र शासनाकडील सूचनांनुसार कारवाई करण्यात आली. थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याचं आढळून आलं. यामुळे हवेली तालुक्‍यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा करोना स्वॅब तपासणी करिता बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

हवेली तालुक्यामधील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने बुधवारी (ता. 8) दिवसभरात उच्चांक गाठला असुन, संपुर्ण तालुक्यात बुधवारी दिवसभरात नव्वदहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हवेली तालुक्यातील अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 390 इतका झाला आहे.

हे वाचा - शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि तीन मंत्री घेऊन भेटायला आले

तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र बुधवारी दिवसभरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात नव्वदहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांची प्रकृती चिंताजणक आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग अकरा दिवसांवरुन दहा दिवसावर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona test report wrong district collector take action against lab