पुण्यात आजपासून लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

कोरोना लस घेण्यासाठी शहरातील 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेमार्फत को-विन ऍपवर नोंदणी केली आहे. त्यामध्ये सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजार 500 आहे.

पुणे - पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात शनिवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली. 

लसीकरण मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने काय तयारी केली आहे, याची माहिती महापौर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आदी उपस्थित होते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पहिल्या दिवशी 800 जणांना लस 
-पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार 
-पहिल्या दिवशी आठ लसीकरण केंद्रांवर एकूण आठशे जणांना लस देणार 
-को-विन ऍपमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांमधून निवड केलेल्यांना फोनद्वारे लसीकरणाची वेळ कळविणार 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

असे होणार लसीकरण 
-नारायण पेठेतील मुख्य लसीकरण कार्यालयात लशीचा साठा 
-तेथून लसीकरण केंद्रांवर लशीचे वितरण केले जाणार 
-लसीकरण केंद्रांवर तीन खोल्या असणार. 
-पहिल्या खोलीत प्रतीक्षा कक्षात नोंदणीकृत लाभार्थ्यांना बसण्याची व्यवस्था 
-या ठिकाणी ओळखपत्र तपासून पडताळणी केली जाणार 
-दुसऱ्या खोलीत लसीकरण कक्षात लस दिल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन सॉफ्टवेअरमध्ये होणार 
-तिसऱ्या खोलीत निरीक्षण कक्षात लस घेतलेल्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवणार 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

बावीस हजार जणांना देणार दोन डोस 
कोरोना लस घेण्यासाठी शहरातील 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेमार्फत को-विन ऍपवर नोंदणी केली आहे. त्यामध्ये सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजार 500 आहे. महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लशीचे 48 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. 10 टक्के वेस्टेज वगळता प्रत्येक कर्मचाऱ्यांना दोन या प्रमाणे अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना लशीचे दोन डोस दिले जाणार आहेत, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

या केंद्रांवर होणार लसीकरण 
- कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ 
- ससून रुग्णालय, पुणे स्टेशन 
- स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा 
- कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरूड 
- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा 
- रूबी हॉल क्‍लिनिक, ताडीवाला रस्ता 
- नोबल हॉस्पिटल, हडपसर 
- भारती हॉस्पिटल, धनकवडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination campaign in Pune city will start at Kamla Nehru Hospital