कोरोनावर मात करण्यासाठी गणरायाकडे साकडे; दगडूशेठ गणपतीसमोर सलग 15 दिवस वेद पठण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

कोरोना महामारीचा मुकाबला करण्याकरिता बळ मिळावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता दगडूशेठ गणपती समोर सलग 15 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ऋग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह गणेश याग, नवचंडी हवन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये केवळ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत केले जाणार आहेत.

पुणे - कोरोना महामारीचा मुकाबला करण्याकरिता बळ मिळावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता दगडूशेठ गणपती समोर सलग 15 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ऋग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह गणेश याग, नवचंडी हवन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये केवळ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत केले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ढुंडीराज तथा अधिक मासानिमित्त चार वेदांच्या संहितेचे पठण मुख्यत्वे आयोजित केले आहे. यांसह विविध यज्ञ, यागांच्या माध्यमातून कोरोनाचे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

मंगळवार, 29 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबर दरम्यान दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत ऋग्वेदातील 10,627 मंत्रांचे वेदमूर्ती नारायण आराध्ये व सचिन कुलकर्णी, यर्जुवेदातील 1975 मंत्रांचे वेदमूर्ती सागर विरसणीकर, बाळकृष्ण गोखले, लक्ष्मीकांत जोशी व तुषार देवधर, सामवेदातील 1875 मंत्रांचे वेदमूर्ती गणेश पुराणिक व सचिन जोशी आणि अथर्ववेदातील 5977 मंत्रांचे वेदमूर्ती नीलेश जोशी व निखिल पांडे हे या चार वेदांचे संहिता पारायण होणार आहे. तसेच, दिनांक 5 ते 9 ऑक्‍टोबर दरम्यान मुख्यत्वे सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग आणि नवचंडी पाठ व हवन असणार आहे. दिनांक 5 ऑक्‍टोबर रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग, विशेष अभिषेक राजोपचार व एकविंशती आवरण पूजन आणि सहस्त्रदुर्ऱ्वाचन, दिनांक 6 ऑक्‍टोबर, मंगळवार रोजी सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग होईल.

रेस्टॉरंट, बार उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय

दिनांक 7 ते 9 नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी कोरोनाच्या निर्वाणार्थ संपुटीत सप्तशती पाठ, दिनांक 8 ऑक्‍टोबर रोजी देवी राजोपचार पूजा, सहस्त्रकुंकुमार्चन, नवार्ण पूजन आणि दिनांक 9 ऑक्‍टोबर रोजी चंडीहवन व पूर्णाहुती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय दिनांक 2 ते 4 ऑक्‍टोबर दरम्यान सुदर्शन याग, धन्वंतरी याग व उग्रनरसिंह हे विश्वाचे पालक भगवान विष्णूंचे याग वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली होतील. तर, मंगळवार, दिनांक 13 ऑक्‍टोबर रोजी मुद्‌गलपुराणातील विविध देवता आणि ऋषिमुनींनी श्री गणेशाची स्तुती केलेल्या विविध स्तोत्रांचे पठण व हवन वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली होणार आहे.

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

मंदिर बंद असून ट्रस्टच्या वेबसाइट, ऍप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवरुन भक्तांना सहभागी होता होईल. तरी भाविकांनी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus dagdusheth ganpati 15 days ved pathan programmes organaized