
पुणे : कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन विविध संस्था, संघटना, सोसायटी, प्रतिष्ठान आणि विविध प्रकारचे ग्रुप यांच्याकडून 'कोरोना वारियर्स, कोरोना योद्धा किंवा 'कोरोना महायोद्धा' असे प्रमाणपत्र देऊन सध्या अनेकांना गौरवण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळल्याने खूश झालेले अनेक 'योद्धे' सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. मात्र या प्रमाणपत्राला कोणतीही शासकीय वैधानिकता नाही.
कोरोना संकटाच्या काळात आपण केलेल्या कामाची कोणीतरी दखल घेतली आणि आपल्याला योद्धा म्हणून गौरवण्यात आल्याने हा आनंद व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर ही प्रमाणपत्रे अपलोड करण्यात येत आहेत. आपल्या ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीला असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल्याने कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी आणि नातेवाईक त्यांचे कौतुक करत आहेत. मात्र कोणाला अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्याचे? त्याबाबतचे निकष काय आहेत? संबंधिताने नेमके कोणते काम करायला हवे? त्याने केलेल्या कामातून किती लोकांना फायदा झाला? की केवळ प्रसिद्धीसाठी असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे? याचा विचार करणारी किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. प्रतिज्ञापत्र देण्यास एखादी व्यक्ती पात्र आहे की नाही हे ठरवणारे कोणतीही नियमावली शासकीय पातळीवर जाहीर करण्यात आलेले नाही. कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या प्रमाणात अशा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्यांचे अवमूल्यन नको :
मुलत: कोरोना ही एका विषाणूजन्य रोगाची महामारी आहे. त्यामध्ये चांगले काम करणाऱ्या कोणत्याही एका घटकातील काही लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करणे योग्य आहे. सध्या काही सामाजिक संस्थांकडून कोरोना योद्धे किंवा महायोद्धे असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यातून प्रत्यक्षात काम करणारे, पण प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या लोकांचे अवमूल्यन करू नये. या प्रमाणपत्रांची काहीच वैधानिकता नाही, असे जेष्ठ वकील ॲड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी सांगितले.
पुरस्कार किंवा प्रमाणपत्र कोणाला द्यायचे आहे हे ठरवण्याचे अधिकार संबंधित संस्था वा संघटनेच्या विश्वस्तांना असतो. त्यानुसार ते प्रमाणपत्र देत आहेत. मात्र या प्रमाणपत्रांमुळे सरकारी पातळीवर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत किंवा त्याचे काही फायदे देखील मिळत नाहीत. बहुतांश वेळा संबंधित संस्था स्वत:च्या प्रसिद्धीसाठी असे प्रमाणपत्र देत असतात. - ॲड. शिवराज कदम-जहागीरदार
विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार मी रक्तदान केले होते. कोरोना काळात रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे. याची दखल घेत मला एका प्रतिष्ठानकडून गौरवण्यात आले.- प्रमाणपत्र मिळालेला तरुण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.