esakal | कोरोना चाचणी होणार आता फिरत्या प्रयोगशाळेत

बोलून बातमी शोधा

Corona Test
कोरोना चाचणी होणार आता फिरत्या प्रयोगशाळेत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना उपचारात सर्वांत महत्त्वाचं ठरतं ते वेळेत निदान. महाराष्ट्रासह देशभरात कोरोना उद्रेक प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रयोगशाळा चाचण्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रयोगशाळांमधून रिपोर्ट उशिरा मिळत आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स’ने फिरती प्रयोगशाळा (मोबाईल टेस्टिंग लॅब) तयार केली असून, पहिल्या टप्प्यात पुण्यासह मुंबई आणि गोव्यात ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू आहे. त्यावर प्रभावी उपचारासाठी वेळेत निदान होणे आवश्यक असते. त्यासाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने तपासणी विकसित केली आहे. त्याला ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ (आयसीएमआर) आणि ‘नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) यांनी प्रमाणित केले आहे.

कोरोनाच्या उद्रेकात प्रत्येक रुग्णाची वेळेत तपासणी होणे आवश्यक असते. त्यासाठी ही फिरती प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल. या प्रयोगशाळेमध्ये स्वयंचलित अद्ययावत उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे पारंपरिक प्रयोगशाळांपेक्षा तीन पट वेगाने यातून चाचण्या करता येणार आहेत.

हेही वाचा: फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश

सद्यःस्थितीत कोरोनाच्या निदानासाठी प्रयोगशाळांवरील ताण वाढला आहे. मर्यादित मनुष्यबळात त्यांना हे काम करावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम ‘आरटी-पीसीआर’चे रिपोर्ट किमान ७२ तास उशिरा रुग्णांना मिळत आहेत. मात्र, अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज फिरत्या प्रयोगशाळांमधून अवघ्या चोवीस तासांमध्ये अचूक रिपोर्ट मिळणार आहेत. प्रत्येक दिवशी दीड ते तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता एका फिरत्या प्रयोगशाळेची असल्याचे मायलॅबतर्फे स्पष्ट करण्यात आले.

लोकांनी तपासण्यासाठी प्रयोगशाळेत येण्याऐवजी प्रयोगशाळांनी लोकांपर्यंत जाण्याची ही वेळ आहे. कोरोनाच्या निदानासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून फिरती प्रयोगशाळा विकसित केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि ‘आयसीएमआर’सारख्या संस्थांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.

- हसमुख रावळ, व्यवस्थापकीय संचालक, मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स