
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील खासगी वैद्य़किय व्यावसायिक असलेल्य़ा कोरोना रूग्णाच्या संपर्कातील वाल्मिकनगर येथील एक रूग्ण पॉझिटिव्ह आला होता. तो रूग्ण आणि संबंधित खासगी वैद्यकिय व्यावसायिक डॉक्टर यांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर
गावात स्वागताची तयारी सुरू असतानाच आली धक्कदायक बातमी
वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील खासगी वैद्य़किय व्यावसायिक असलेल्य़ा कोरोना रूग्णाच्या संपर्कातील वाल्मिकनगर येथील एक रूग्ण पॉझिटिव्ह आला होता. तो रूग्ण आणि संबंधित खासगी वैद्यकिय व्यावसायिक डॉक्टर यांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज कोविड केअर सेंटरमधून उपचारानंतर सोडण्यात येणार होते. गावात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच दुपारी या रूग्णाच्या कुटुंबातील चार महिन्याच्या बालिकेसह तब्बल सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे वाल्हेकरांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
वाल्हे येथील खासगी वैद्यकिय व्यावसायिकास चौदा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जेजुरी येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कातील १९ व्यक्तींपैकी वाल्मिकनगर येथील त्यांच्या एका रूग्णास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती निष्पण झाले होते. त्यासदेखील जेजुरी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (ता. ४) संबंधित खासगी वैद्यकिय व्यावसायिक डॉक्टर व हा रूग्ण या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आज त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. मात्र, आज दुपारी तालुक्यातील ३३ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या ५९४ झाली असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. यामध्ये वाल्हे येथील वाल्मिकनगरमधील बरे होऊन येत असलेल्या रूग्णाच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील सर्व सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. यामध्ये त्यांची चार महिन्याची लहान मुलगी देखील पॉझिटिव्ह आल्याने वाल्हेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या सात जणांना जेजुरी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर...
वाल्मिकनगर येथील कोरोना रूग्णाच्या जवळच्या संपर्कातील सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित रूग्णांच्या घरासह वाल्मिकनगर परिसरामध्ये निर्जुतुकीरण करण्यात येणार असून आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचात कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून संबंधित रूग्णांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच अमोल खवले, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे व पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी सांगितले.