राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

राजेंद्र सांडभोर
Monday, 3 August 2020

सरकारी प्रशासनाच्या आणि कंपनी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्यात कोरोना थैमान घालत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी मनमानी निर्णय घेतल्याने सर्वत्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, असा आरोप

राजगुरूनग (पुणे) : सरकारी प्रशासनाच्या आणि कंपनी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्यात कोरोना थैमान घालत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी मनमानी निर्णय घेतल्याने सर्वत्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, असा आरोप तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. राज्य सरकार याबाबत लोकप्रतिनिधींना सोडून अधिकाऱ्यांवर विसंबून राहिले. त्यामुळे या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. तर, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचार करून, काहीजण मृताच्या टाळूवरचे लोणी खात आहेत, असेही ते म्हणाले. 

फी कपातीसाठी मेल भेजो आंदोलन

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका इत्यादींची पुरेशी व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. या अव्यवस्थेमुळे गंभीर रुग्णांना, जीव गमवावा लागण्याच्या घटना तालुक्याला पाहाव्या लागल्या आहेत. रुग्णालये बिलांची भरमसाट आकारणी करीत आहेत आणि अधिकारी झापडबंद बसले आहेत. आर्थिक चक्रे बंद राहू नयेत, यासाठी कंपन्या सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही राहिलो. कंपन्या सुरू झाल्यावर कंपनी व्यवस्थापनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. पण, ते बेपर्वाईने काम करत आहेत. कंपन्यांना लागू केलेल्या अटी शर्ती त्यांनी पाळलेल्या नाहीत. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनीही या अटींचे पालन होते आहे की नाही, त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कंपनी कनेक्शनमधून रुग्ण वाढत आहेत. शिवाय समोर येत असलेली संख्या खरी येत नाही. अनेक कंपन्या आपल्या कामगारांना कोरोना झाल्याचे लपवत आहेत, असा आरोप आमदार मोहिते यांनी केला. 

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार

या संकटाशी लढण्यासाठी आलेला निधीही काय केला माहीत नाही. जे वीस रुपयाला होलसेल मास्क मिळतात, ते नव्वद रुपये किमतीने खरेदी करण्यात आले, यासारख्या गोष्टी आमच्या कानावर आल्या आहेत. कंपन्यांच्या सीएसआरमधून अनेक गोष्टी तालुक्यात करता येतील. पण, कंपन्या हा निधी तालुक्याला देत नाहीत. तो सीएम फंडाला दिल्याचे सांगतात. तो गेला की नाही, हे माहित नाही. तालुक्याकडे आलेल्या काही सीएसआर निधीचाही योग्य विनियोग करण्यात आलेला नाही. त्याचा अधिकार्‍यांनी हिशोब दिला पाहिजे, असे आमदार मोहिते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Dilip Mohite criticizes the state government