जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात कोरोनाचे १२१ रुग्ण झाले असून, सर्वाधिक १४ रुग्ण हे धालेवाडी येथील आहेत.तसेच, पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्यास पुणे येथील तपासणीत पॉझिटिव्ह निघाले आहेत.
धालेवाडी येथील लग्नसोहळ्यात आलेला पाव्हणा कोरोना बाधित निघाल्याने त्याच्या संपर्कातील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज धालेवाडी, शिरोली बुद्रुक व हिवरे बुद्रुक येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे, तर ६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, औरंगपूर, मोकासबाग व पिंपळगाव-आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जुन्नर तालुक्यातआजपर्यंत ११०१ संशयित कोरोना रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून, आज ६२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बाहेरगावाहून आलेल्या ३,७०३ जणांपैकी ३६ जणांना संस्थात्मक, तर ३,६६७ होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. जुन्नर तालुका पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्यास पुणे येथील तपासणीत पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य दक्षता घेत कामकाज सुरू ठेवले असल्याचे गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी सांगितले.
जुन्नर शहरातील एक नागरिक वैयक्तिक औषध उपचारासाठी पुणे येथे गेले असताना त्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे नगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णसंख्या वाढत असल्याने पोलिस व नगर पालिका प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे.
Edited by : Nilesh Shende
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.