esakal | कोरोनाचा धोका अद्यापही कायम
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाचा धोका अद्यापही कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना गेल्या काही दिवसांपासून शहरात रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. पण अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्या कमी होत नसल्याने कोरोनाचा धोका कायम आहे. सध्याचे सणवाराचे दिवस काळजी करण्यासारखेच आहेत, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने नुकतेच सर्व राज्य सरकारला दिलेले आहेत. यानंतर पुणे महापालिकेने देखील तयारी सुरू केली. महापालिकेची सर्व रुग्णालये अद्ययावत करणे, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करणे, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढवणे याकडे लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाला महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. दरम्यान, महापालिकेने दुसऱ्या लाटेमध्ये दळवी रुग्णालय, शिवाजीनगर जम्बो रुग्णालय, गणेश कला क्रीडा मंच कोव्हिड सेंटर, इएसआयसी बिबवेवाडी येथे कोव्हिड सेंटर सुरू केले होते. पण रुग्णसंख्या कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने हे कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले आहेत. सध्या बाणेर येथील कोव्हिड सेंटर सुरू आहे. शहरातील इतर सेंटर बंद झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा: पुणे: गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

शहरात गेल्या गेल्या १३ दिवसांत केवळ चार दिवस २०० पेक्षा कमी रुग्ण असून, उर्वरित सर्व दिवस रुग्णसंख्या २०० च्या पुढे आहेत, त्यातही २५ ऑगस्ट रोजी ३९९ रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर घातली होती. या काळात सरासरी २५० च्या आसपास रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्या खालीवर होत आहे, पण पूर्वीप्रमाणे २०० च्या खाली ती जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेसाठी मनपाची तयारी; पाहा व्हिडिओ

"गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या खाली-वर होत आहे. पुढील दिवस हे सणांचे असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. लसीकरण झाले तरी काळजी घेणे आवश्‍यक आहे."

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख

loading image
go to top