
सकाळी उठल्यावर आमचे छायाचित्र प्रमोद शेलार यांनी पुण्यातील औंध भागातील पाठवलेला व्हिडिओ पाहिला आणि डोकं सुन्न झाले. वाईन शॉप समोर लोकांनी भली मोठी रांग लावली होती. थोड्याच वेळात शहराच्या विविध भागात वाईन शॉप समोरच्या रांगांचे व्हिडिओ व्हायरल झाले. मद्यपान करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, पण लोक कशासाठी एवढे आतूर आहेत याची झलक पाहायला मिळाली. दारुच्या दुकानासमोर रांगा लावल्या याचे फारसे आश्चर्य नाही, पण ज्या पद्धतीने गेली महिनाभरापासून आपण लाॅकडाऊन आणि शारीरिक अंतर राखण्याचे नियम पाळले ते क्षणार्धात उधळून लावण्यात आले. यात दोष नागरिकांचा नाहीच, तर तो अंमलबजावणीतील आहे.
पुणे महापालिकेने लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भातला आदेश मध्यरात्री प्रसिद्ध केला. त्यात शहरातील 69 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून जाहीर करण्यात आली. यात शहरातील जवळजवळ 80 टक्के भाग येतो. या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर म्हणजे ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी आहे अशा औंध बाणेर, कोथरूड बावधन, वारजे कर्वेनगर आणि सिंहगड रोड या चार क्षेत्रीय कार्यालयांचा भाग हा प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरचा भाग म्हणून जाहीर करण्यात आला. त्या ठिकाणी लॉकडाऊन चे नियम शिथिल करण्यात आले. नियम केवळ शिथिल केले आहेत, ते पूर्णपणे उठवलेले नाहीत. मात्र त्याबाबत योग्य ती स्पष्टता नसल्याने त्याचा चुकीचा अर्थ पुणेकरांनी काढलेला दिसतो. त्यामुळेच सकाळपासून शहरातील जवळजवळ सर्वच रस्ते पुन्हा गजबजले आहेत. लोक सकाळपासून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहेत, ही सर्व हालचाल केवळ ज्या भागातील नियम शिथिल करण्यात आले आहेत, तेथे नसून संपूर्ण शहरात झाली आहे. म्हणजेच सिंहगड रस्त्यावर राहणारे लोक चक्क मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेले दिसले. तर वडगावशेरीतील नागरिकांनी दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत, याचाच अर्थ महापालिका आणि पोलिसांनी लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भातील चे नियम प्रसिद्ध केले त्याबाबत लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. लोकांचे सोडाच पण या संदर्भामध्ये स्वतः महापालिकेचे कर्मचारी, पोलिस अधिकारी यांच्यामध्येही हद्दीवरून आणि नियमांच्या शिथिलीकरणावरून स्पष्टता दिसत नाही. याचा सर्वात मोठा धोका असा आहे की, जर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती बाहेर पडले तर आत्तापर्यंतच्या लाॅकडाऊन पाळण्याला काहीच अर्थ उरणार नाही आणि संसर्गाचा धोका आणखी वाढू शकेल.
आपल्याला जास्त दिवस लाॅकडाऊन मध्ये राहणे कोणत्याच दृष्टीने परवडणारे नाही, हे जरी खरे असले तरी अजूनही धोका टळलेला नाही, ही गोष्ट विसरता कामा नये. सिंहगड रस्ता किंवा औंधमध्ये नियम शिथिल केले असले तरी त्या भागातील नागरिकांना इतर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जाता येईल काय, याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. जी 5 दुकाने सुरू करावी असे आदेशात म्हटले आहे, त्याबाबतही स्पष्टता नसल्याने नेमकी कोणती दुकाने सुरू ठेवायची आणि कोणती बंद ठेवायची हेही निश्चित करावे लागणार आहे. दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली याचा अर्थ आपण नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडण्यास परवानगी दिली असा होतो. मग नागरिकांनी बाहेर पडून त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू करायचे आहेत काय, त्याबाबत काय नियम असतील, हे तातडीने स्पष्ट करायला हवे. कारण आजही औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात चार, कोथरूड-बावधन 4, वारजे कर्वेनगर येथे 4 आणि सिंहगड रोड परिसरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. जर लोक सरसकटपणे फिरू लागले तर संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील बऱ्याच ठिकाणांचे पेट्रोल पंप आज सुरू झाले. त्याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी एकाच गाडीवर दोघा दोघांनी बसून मोठ्या रांगा ही लावलेल्या पहायला मिळाल्या. पेट्रोल डीलर असोसिएशनकडे चौकशी केली असता त्यांनी नव्या नियमानुसार नागरिकांना पेट्रोल देण्याची मुभा देण्यात आल्याचे सांगितले. तर यासंदर्भात प्रशासन आणखी काही वेगळ्याच सूचना देणार असल्याचेही समजते. व्यवहार सुरू करण्यास कोणाचाच विरोध असणार नाही, उलट लवकरात लवकर ते सुरु व्हायला हवेत. मात्र ही गोष्ट वारंवार मनात पक्की करायला हवी की अजूनही पुणे शहरामध्ये 1817 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 1283 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असताना आपल्यावरील धोका कमी झालेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांसाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे. ते केले नाही तर गेली महिनाभर पाळलेल्या लॉकडाऊनला काहीही अर्थ राहणार नाही.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एकतर नियमांमध्ये शिथीलता देण्यासाठी आपण घाई केली आहे. ती करताना कोणतेही पूर्व नियोजन केलेले दिसत नाही. महापालिका आणि पोलिसांच्या पातळीवरही नेमके काय करायचे याची स्पष्टता नाही. जर हा असाच गोंधळ सुरू राहिला तर पुण्यातील रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी त्याचे विपरीत परिणाम समोर येतील. त्यामुळे प्रत्येक बाबतीत स्पष्टता हवी. त्यात नागरिकांना नियम शिथिल केलेल्या भागात केव्हाही फिरता येणार आहे का? दुकानांसोबत कार्यालये सुरू करण्यास परवानगी राहील का? जर कार्यालय सुरू केली तर प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना शीथिलता दिलेल्या भागात जाता येता येईल? नियम शिथिल केलेल्या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे का? या प्रश्नांची उत्तरे तातडीने मिळायला हवीत आणि बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी कोणते नियम पाहायला हवेत हे स्पष्ट व्हायला हवे, अन्यथा ही 'जल्दबाजी' महागात पडेल, हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.