पुण्यातलं लोहगाव एअरपोर्ट बिझी; आता 34 उड्डाणांची तयारी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 मे 2020

देशातंर्गत विमान वाहतुकीस केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिल्यावर सोमवारी पहिल्या दिवशी विमानांच्या 14 फेऱया झाल्या होत्या. त्यातून 1463 प्रवाशांची वाहतूक झाली होती.

पुणे Coronavirus : लोहगाव विमानतळावरून मंगळवारी दिवसभरात 26 विमानांद्वारे सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक झाली. इंडिगोच्या कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्लीच्या फ्लाईट रद्द झाल्या. लोहगाव विमानतळ प्रशासनाने विमानाच्या 34 उड्डाणांची तयारी केली आहे. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनांनुसार दिल्ली, बंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोचीन या मार्गांवरील विमान वाहतूक पुण्यापासून सुरू करण्यास विमान कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

आणखी वाचा - राहुल गांधींच्या वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ

देशातंर्गत विमान वाहतुकीस केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिल्यावर सोमवारी पहिल्या दिवशी विमानांच्या 14 फेऱया झाल्या होत्या. त्यातून 1463 प्रवाशांची वाहतूक झाली होती. 12 फेऱया पहिल्या दिवशी रद्द झाल्या होत्या. दुसऱया दिवशी 12 फेऱयांची वाढ होऊन 26 फेऱ्या झाल्या, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. विमानतळावर रात्री 9 वाजेपर्यंत 13 विमानांद्वारे 648 प्रवासी आले तर, 13 विमानांद्वारे 1349 प्रवासी पुण्यातून रवाना झाले, असेही त्यांनी सांगितले.

प्रवाशांशी संपर्क साधून होमक्वारंटाईन
लोहगाव विमानतळावर उतरलेल्या सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. सोमवारी काही प्रवाशांच्या हातावर शिक्के मारण्याचे राहिले होते. या बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विचारणा केली असता त्यांनी, या प्रवाशांचे पत्ते विमान कंपन्यांकडे आहेत. त्यांच्याद्वारे प्रवाशांशी संपर्क साधण्यात येत असून त्यानुसार त्यांना आदेश देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा - मुंबई, पुण्याबाबतचा तो मेसेज खोटा; वाचाा बातमी

पार्किंग लॉट रात्री बंदच
लोहगाव विमानतळावर रात्रभर वाहने पार्किंग लॉटमध्ये ठेवण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. त्यावर विमानतळ प्रशासनाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशांनुसार पार्किंग अद्याप खुले करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले. तसेच तात्पुरते पार्किंग सुरू ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.  

रिक्षासाठी 400 हून अधिक प्रवासी
विमानतळावरून उतरलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी सिटी ग्लाईड ऑटोतर्फे रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 9859198591 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर दिवसभरात सुमारे 400 प्रवाशांनी रिक्षासाठी मागणी नोंदविली होती, असे सिटीग्लाईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे यांनी सांगितले.

आणखी वाचा - पुण्यातल्या त्या 400 पॉझिटिव्ह रुग्णांबाबत मोठा खुलासा

एजंट असोसिएशनला विश्वासात घ्या
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे (टॅप) संचालक निलेश भन्साळी म्हणाले, देशातंर्गत विमान वाहतूक सुरू झाली, ही स्वागतार्ह बाब आहे. विमान कंपन्यांनी या बाबत तिकिटांचे बुकींग करणाऱ्या कंपन्यांना पूर्वकल्पना दिली असती, तर आणखी तयारी करता आली असती. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्या या दोन्ही घटकांचा फायदा झाला असता. येत्या दोन दिवसांत विमान वाहतूक सेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. कारण आमचे नुकसान झालेले असले तरी, प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown lohegaon airport getting busy