महाराष्ट्रापुढे आव्हान : कोरोना रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

राज्यातील सरकारी रुग्णालयात पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किटचा दुष्काळ पडला असून कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर उपचार करायचा तरी कसा, असा सवाल आता राज्यातील डॉक्टर विचारू लागले आहेत. 

पुणे - राज्यातील सरकारी रुग्णालयात पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किटचा दुष्काळ पडला असून कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर उपचार करायचा तरी कसा, असा सवाल आता राज्यातील डॉक्टर विचारू लागले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सार्वजनिक आरोग्य खाते, महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांना या विषाणूंच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. उपचारांच्या निमित्ताने, रुग्णांच्या सुश्रुषेसाठी जाणाऱ्या परिचारिका, तेथील कर्मचारी या सर्वांना संसर्गाची शक्यता सर्वाधिक असते. त्यासाठी विशेषतः अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांच्या संरक्षणासाठी ‘पीपीई किट’ हा सुरक्षिततेचा प्रभावी मार्ग आहे. तो त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. पण, हे किट सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे तुटपुंज्या पीपीई किटवर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणार तरी कसे?, असा सवाल आता सरकारी डाँक्टर विचारत आहेत. 

Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास 

राज्यातील पुणे, मुंबईसारख्या महापालिकांनी यापूर्वीच पीपीई किटचा पुरेसा साठा केला आहे. याच दोन शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने त्यांच्यासाठी ते अत्यावश्यकदेखील आहे, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

राज्यातील आरोग्य खाते आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या रुग्णालयांमध्ये पीपीईच्या तुटवड्याची तीव्रता सर्वाधिक आहे. या बाबत सरकारी यंत्रणेकडे वारंवार पाठपुरवा करण्यात आला. पण, अद्यापही याचा पुरवठा झालेला नाही. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जेमतेम दहा पीपीई किट शिल्लक राहिले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी डाँक्टरांच्या संरक्षणाची व्यवस्था काय, असेही आता डाँक्टर विचारत आहेत. 

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

औषध खरेदी, मास्क आणि पीपीई किट या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. 

मार्डचा इशारा 
पीपीई किट न मिळाल्यास कोरोना बाधीत रुग्णांची सेवे करण्यास सहभागी होणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र निवासी डाँक्टर संघटना (मार्ड) यांनी दिला आहे. कोरोनाच्या उद्रेकात रुग्णसेवा करण्याची मनापासून इच्छा आहे. मात्र, त्यासाठी स्वतःचीही सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मार्डतर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra facing biggest challenge ppe kits shortage