पुणे : बँकांकडे आढळताहेत बनावट नोटा; टोऴी सक्रिय

पांडुरंग सरोदे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे : पुणे शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील बँकांमध्ये पैसे भरण्याच्या बहाण्याने काही व्यक्तींकडून बनावट नोटांचा भरणा केला जात असल्याच्या घटना काही दिवसांपासून घडू लागल्या आहेत. बँकांना आढळणाऱ्या बनावट नोटांची संख्या कमी असली तरी, सावधगिरीचा उपाय म्हणून बँकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बनावट नोटा पसरविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : पुणे शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील बँकांमध्ये पैसे भरण्याच्या बहाण्याने काही व्यक्तींकडून बनावट नोटांचा भरणा केला जात असल्याच्या घटना काही दिवसांपासून घडू लागल्या आहेत.
बँकांना आढळणाऱ्या बनावट नोटांची संख्या कमी असली तरी, सावधगिरीचा उपाय म्हणून बँकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बनावट नोटा पसरविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाखांकडून जमा होणाऱ्या रकमेमध्ये शंभर रुपयांच्या तीन बनावट नोटा बँकेला आढळल्या होत्या. याच पद्धतीने बँक ऑफ इंडियामध्येही शंभर रुपयांच्या 18, तर पन्नास रुपयांच्या पाच अशा बनावट नोटा 'करन्सी चेस्ट मशिन'च्या तपासणीत आढळल्या होत्या. या दोन्ही बँकांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बँकांकडे बनावट नोटा येण्याच्या घटना नवीन नाहीत. त्याविषयी तत्काळ रिझर्व्ह बँकेलाही कळविले जाते. पोलिसांकडे फिर्यादही दिली जाते. मात्र, बनावट नोटा कुठून व कशा येतात, याबाबतचा शोध घेण्याचे प्रयत्न होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

पोलिसांनीही जप्त केल्या बनावट नोटा 
शहरामध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्यांचे वितरण करणाऱ्या एका तरुणास गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वी अटक केली होती. संबंधित आरोपीने शहराच्या वेगवेगळ्या भागात सात ते आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तीन महिन्यांपूर्वी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फलटणमधील एका तरुणास अटक केली होती. त्याच्याकडे 84 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. त्याचा साथीदार मात्र अद्यापही फरारी आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये बनावट नोटा पसरविणारी, परराज्यातील टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

"शहराच्या वेगवेगळ्या शाखांमधून बँकांच्या दैनंदिन कामकाजावेळी बनावट नोटा बँकांकडे येतात. संबंधित नोटा "करन्सी चेस्ट मशिन'मध्ये तपासताना त्यातून बनावट नोटा बाजूला फेकल्या जातात. दर महिन्याला अशा बनावट नोटा आढळतात. त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, रिझर्व्ह बँकेला रीतसर माहिती दिली जाते. 
- जे. ए. ठकार, करन्सी चेस्ट इन्चार्ज, बँक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड शाखा 

बँकांमध्ये बनावट नोटा सापडण्याचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन बनावट नोटा वितरित करणाऱ्यांना अटक केली आहे. बनावट नोटा पसरविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र गोपनीय माहितीद्वारे त्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करू. 
- अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit notes available to banks