जादूटोण्याच्या संशयातून खेडमध्ये दांपत्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

राजगुरुनगर - महिला जादूटोणा करीत असल्यामुळे गावातील लहान मुलांचा मृत्यू होतो, अशा अंधश्रद्धेतून संबंधित आदिवासी कातकरी समाजातील महिलेचा आणि तिच्या पतीचा खून केल्याची घटना खेड तालुक्‍यातील औंढे येथे घडल्याचे गुरुवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आले. लीलाबाई सुदाम मुकणे (वय ५०) आणि नवसू पुनाजी वाघमारे (वय ५५; दोघेही मूळ रा. कोहिंडे खुर्द, सध्या रा. औंढे), अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील औंढे या गावात लीलाबाई मुकणे आपले दुसरे पती नवसू वाघमारे यांच्यासोबत एका ओढ्याजवळ झोपडी करून राहत होते. लीलाबाई या मांत्रिक आणि भक्तीण म्हणून परिचित होत्या आणि आजारांवर गावठी उपचार सांगत असत. त्यांच्या जादूटोण्यामुळे गावातील लहान मुलांचा मृत्यू झाला, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यातून त्यांचा आणि त्यांचे दुसरे पती नवसू यांचा गुरुवारी सकाळपूर्वी धारदार हत्याराने डोक्‍यात, कानाजवळ व पोटावर वार करून खून करण्यात आला. 

याबाबतची फिर्याद लीलाबाई यांचा मुलगा राजू मुकणे याने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीमध्ये त्यांनी तिघांवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात जैतू चिंधू बोरकर (वय २२) आणि बबन एकनाथ मुकणे (वय ३०) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. जैतू याच्या मुलीच्या पोटात गाठ झाली होती. तसेच, बबन मुकणे याच्या बायकोच्या हातावर फुटकुळ्या येत असत. हे आजार लीलाबाई हिच्या जादूटोण्यामुळे झाले, असा त्यांचा संशय होता. त्यामुळे चिडून त्यांनी लीलाबाई व नवसू यांचा खून केला.

Web Title: couple murdered black magic