इंदापूरजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; पुण्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

या अपघातात ट्रक आणि कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामुळे कारचे इंजिन बाहेर पडले आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर-अकलूज राज्य मार्गावर विठ्ठलवाडी (ता.इंदापूर) येथील वळणावर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातात मृत पावलेले दांपत्य पुण्यात वास्तव्यास होते. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी (ता.३) सकाळी पावणेआठ वाजता झाला असून अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.

'सरकार महत्त्वाचं की अस्मिता? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी!'

कार चालक पांडुरंग सिताराम ताथवडे (वय ५८) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५०, दोन्ही रा. खडकी, पुणे, मूळ गाव- केंदूर पाबळ, ता. शिरुर, जि.पुणे) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. 

टाटा ट्रक (क्र.एम.एच १२ एम.व्ही.७४३४) हा बावडा बाजूकडून इंदापूरकडे भरधाव वेगाने जात असताना त्याची समोरून येणाऱ्या नेक्सॉन कार (क्र.एम.एच १२ आर.एफ.२६६२) ला जोरदार धडक बसली. त्यामुळे कार चालक आणि त्यांची पत्नी दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. परिणामी ते जागीच मरण पावले.

पधारो म्हारे देस; उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमण​

या अपघातात ट्रक आणि कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामुळे कारचे इंजिन बाहेर पडले आहे. अज्ञात ट्रक चालकाविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित जाधव पुढील तपास करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple from Pune died on the spot in an accident between a truck and a car near Indapur