गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी महिला डॉक्‍टरला सक्तमजुरी 

गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी महिला डॉक्‍टरला सक्तमजुरी 

पुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. 

डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे हॉस्पिटल आहे. या प्रकरणात रानडे हॉस्पिटलचे डॉ. मकरंद रानडे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. रानडे आणि डॉ. मथराणी हे गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती तथापि संस्था आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेला 2011 मध्ये मिळाली होती. त्याबाबत त्यांनी राज्य कुटुंब कल्याण मंडळाला कळविले होते. याचा छडा लावण्यासाठी एका जोडप्याला रुग्णालयात पाठविले. डॉ. रानडे यांनी नऊ हजार रुपये घेऊन त्यांना डॉ. मथराणी यांच्या सोनोग्राफी केंद्रात पाठविले. या ठिकाणी कोणताही अर्ज भरून न घेता तपासणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. रानडे यांचे रुग्णालय व डॉ. मथराणी यांचे सोनोग्राफी केंद्र "सील' करण्यात आले होते. तसेच त्यांचा परवाना जप्त केला होता. महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी ही कारवाई केली होती. 

या खटल्याचे कामकाज महापालिकेचे वकील अनंत रणदिवे यांनी पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांना पालिकेचे मुख्य विधी अधिकारी मंजूषा इधाटे यांनी मार्गदर्शन केले. 

मुळात महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळे चाचणीबाबतचा दृष्टिकोन बदलायला हवा. कोणा एका व्यक्तीला शिक्षा लागावी, असा उद्देश नाही; पण त्यातून समाजपरिवर्तन व्हायला हवे. 
- अनंत रणदिवे, वकील 

नोंदी अपुऱ्या असणे म्हणजे लिंग निवड करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. लिंग निदानाची पद्धत अजूनही संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्याच्या चोख अंमलबजावणीकडे सर्व डॉक्‍टर आणि सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. 
- किरण मोघे,  राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com