दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून व्यापारी आक्रमक

pune shop
pune shop

पुणे - दुकाने उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांना त्यांनी साकडे घातले आहे. तसेच दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार ५ एप्रिलपासून दुकाने बंद ठेवण्यास सुरवात झाली आहे. मात्र, सलग २५ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची स्थानिक व्यापाऱयांची तयारी नसल्याचे आता दिसू लागले आहे. त्यामुळे सुरवातीला प्रशासनाला साथ देण्याची भूमिका घेणाऱया संघटनांनाही आता व्यापाऱयांच्या दबावामुळे भूमिका बदलावी लागत आहे.

दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून शहरातील अनेक संघटनांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री, लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करण्यास सुरवात केली आहे. हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. शहरातील सुमारे १० लाख कामगार दुकानांवर अवंलंबून आहेत. तसेच सणांच्या दिवसात व्यापार कोसळला तर पुन्हा उभारी घेण्यास प्रदीर्घ काळावधी जाईल आणि त्यातून अतोनात नुकसान होईल. तसेच ग्राहकांनाही या बंदचा मोठा फटका बसत असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. 

रोज काही काळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली तर, विकेंड लॉकडॉऊनचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. त्यासाठी राज्य सरकार सांगेल त्या उपाययोजनांचे पालन करू. पण, सणासुदीच्या दिवसांत व्यापार उद्ध्वस्त करू नका. मागच्याच लॉकडॉऊनमधून व्यापारी अजून सावरलेले नाहीत. 
- फत्तेचंद रांका (अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ)

पूर्ण लॉकडॉऊन ऐवजी ५० टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान दुकाने उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. तसेच कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. मात्र, सलग २५ दिवस दुकाने बंद ठेवल्यास व्यापारी आणि व्यापारही आर्थिकदृष्ट्या कोसळतील. 
-राजेश शहा (उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र- फाम)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व्यतिरिक्त सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी  व्यापारी प्रशासन व सरकारला निश्चित मदत करेल. परंतु, आता पुन्हा २५ दिवस दुकाने बंद ठेवली तर, व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. 
-सचिन निवंगुणे (अध्यक्ष, रिटेल व्यापारी संघ)

दुकाने बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास व्यापाऱयांच्या संतापाचा उद्रेक होईल. त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. आरोग्य सुविधा वाढविण्यापेक्षा राज्य सरकार लोकांना घरात बसवत आहे, ही चुकीची बाब आहे. 
- महेंद्र व्यास (भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष )

व्यापारी म्हणतात...
- सोमवार ते शुक्रवार काही वेळ दुकाने उघडण्याची परवानगी द्या 
- विकेंड लॉकडॉऊनचे (शनिवार- रविवार) पालन करण्यास तयार 
- ५० टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत दुकाने सुरू करण्याची तयारी
- सणांच्या दिवसांत व्यापार उद्ध्वस्त करू नका  
- सर्व शासकीय नियमांचे पालन करण्याची तयारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com