पुण्यात कोरोनादूत करणार कुटुंबनिहाय तपासणी; 2300 पथके स्थापन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कुटुंबनिहाय तपासणी केली जाणार आहे. यासाठी २ हजार ३०० तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १ हजार ५३ गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कुटुंबनिहाय तपासणी केली जाणार आहे. यासाठी २ हजार ३०० तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकासोबत प्रत्येकी दोन कोरोनादूत देण्यात आले आहेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मंगळवारी (ता.१५) सांगितले. जिल्ह्यातील १९७ गावांमध्ये दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या सर्व गावांमध्ये  हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पानसरे म्हणाल्या, "ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना  दिल्या जात  आहेत. याशिवाय दररोजच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.समर्पित कोविड आरोग्य केंद्र व समर्पित कोविड रुग्णालयांची रोज ऑनलाइन बैठक घेऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशिक्षण व सूचना देण्यात येत आहेत. तसेच दहापेक्षा जास्त  रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये सेक्टरनिहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत. घरोघरी जाऊन तपासणी व रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मृत्यूदर कमी करण्यावर जास्त भर देण्यात येत असून त्यासाठी तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत."

हे वाचा - पुणे जिल्ह्यात आज २४८१ नवे कोरोना रुग्ण; आज टेस्ट निम्म्यावर

ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय उपचारापासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
- निर्मला पानसरे, 
अध्यक्षा, जिल्हा परिषद, पुणे.

पुणे जिल्ह्यात १ हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी आतापर्यंत १ हजार ५३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान शिरकाव झालेल्या गावांपैकी ३२९ गावांमधील कोरोना रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत ७२४ गावांमध्ये सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात ३५४ गावांनी रोखला कोरोना 
दरम्यान, जिल्ह्यातील ३५४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून आजतागायतच्या सव्वासहा महिन्यांच्या कालावधीत या  ३५४ गावांमध्ये एकही संशयित  किंवा कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. 

सव्वाशे गावात १५ हून जास्त रुग्ण 
याशिवाय अन्य १३२ गावांमध्ये मात्र प्रत्येकी १५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हवेली तालुक्यातील सर्वाधिक ३१ गावांचा समावेश आहे.  याशिवाय किमान दहा किंवा रुग्ण असलेली ६५ आणि पाच रुग्ण असलेली १७३ गावे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 pune zp family wise checking 2300 team