esakal | राज्यातील बाजार समित्यांना उभारता येणार कोविड केअर सेंटर

बोलून बातमी शोधा

Agricultural Produce Market Committee
राज्यातील बाजार समित्यांना उभारता येणार कोविड केअर सेंटर
sakal_logo
By
प्रवीण डोके

पुणे - राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांना आता कोविड केअर सेंटर उभा करता येणार आहे. समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५ टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर ( Covid Care Center ) सुरू करण्यासाठी सहकार, पणन विभागाने परवानगी दिली आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही गोष्ट तातडीची आणि अतवश्यक असल्याने समित्यांना सुरुवातीला दहा लाख व मान्यता घेऊन त्यापेक्षा अधिक खर्च करता येणार आहे.

राज्यातील ज्या बाजार समित्यांना कोविड सेंटर उभा करायचे आहे. त्या समित्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच दहा लाखांपेक्षा जास्त खर्च येत असणाऱ्या समित्यांना पणन संचालकांची आठ दिवसात परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच या खर्चास मान्यता देण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत. यासाठी या विभागाने काही नियम ही घालून दिले आहेत. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पणन संचालक सतीश सोनी यांनी समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करता यावे यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला होता.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

यामध्ये कोविड केअर सेंटर हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून ऑक्सिजन केंद्रक किंवा ऑक्सिजन सिलिंडर, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. या सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण, नाष्टा आणि चहाची व्यवस्था करायची आहे.

कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने कोविड संदर्भात निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. कोविड केअर सेंटरवर झालेल्या खर्चाची नोंद स्वतंत्ररित्या विशेष नोंदवहीत नमूद करून याबाबतचा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. तसेच कोविड केअर सेंटरसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

पॉइंटर -

- समित्यांनी व्यापारी संघटनांना आवाहन करून प्रायोजकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत

- कोविड केअर सेंटरचा कालावधी लॉकडॉउन आणि त्यानंतर ३० दिवसांचा असणार आहे

- कालावधी वाढविण्याची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी चर्चा करून प्रस्ताव सादर करावा

सध्या सर्वत्र कोरोणाची परिस्थिती पाहता. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सक्षम बाजार समित्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध निधीचा वापर या भयावह परिस्थितीमध्ये लोकहितासाठी करणे आवश्यक असल्यामुळे हा प्रस्ताव शासनाने तातडीने मान्य केला. तसेच याची अंमलबजवणी तात्काळ करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच बाजार समित्यांना कोविड सेंटर उभारण्यासाठी भांडवली खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

- सतिश सोनी, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य