शेणाच्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार
मंचर, ता. १ : निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील मानसी बाबाजी निघोट व सायली बाबाजी निघोट या दोन बहिणींनी गाईच्या शेणापासून आकर्षक, पर्यावरणपूरक १०० प्रकारच्या विविध रंगांतील शोभेच्या कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. त्या मराठी माणसांनी सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेतही नेल्या आहेत.
‘माझं वृंदावन’ नावाने निघोट बहिणींनी व्यवसाय सुरू केला. त्यांनी शेणापासून बनविलेल्या वस्तूंना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या वस्तुंची २०० रुपयांपासून दीड हजार रुपयापर्यंत किमती आहेत. भविष्यात आणखी तरुणींना या व्यवसायाशी जोडून रोजगारनिर्मिती करण्याचा निघोट बहिणींचा मानस आहे.
इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारी मानसी हिने नोकरीच्या सुरक्षित वाटेपेक्षा आवडीच्या क्षेत्राची निवड केली. दूध व्यवसायातून सुरुवात झालेला तिचा प्रवास गाईच्या शेणापासून कलात्मक वस्तू तयार करण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. दूध व्यवसाय हा केवळ निर्णय नव्हता, तर ती माझी आवड होती. माझ्यातील कला जपत सुरू केलेला हा प्रवास म्हणजेच ‘माझं वृंदावन’ प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही या शोभेच्या वस्तू पाहून कौतुक करून प्रेरणा दिली, असे मानसी निघोट हिने सांगितले.
शेती व दूध व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना मानसीने घराशेजारील गोठ्यात काम शिकण्यास सुरुवात केली. पहाटे चार वाजता उठून गायांच्या धारा काढणे, चारा टाकणे अशी कामे तिने पाच ते सहा महिने मन लावून केली. या काळात दूध उद्योगातील वास्तव समजून घेताना तिला अनेक अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी जाणवल्या. त्यातूनच गाईच्या सहजीवनातून काही सकारात्मक निर्माण करण्याचा विचार तिच्या मनात पक्का झाला.
याच विचारातून ‘गाईच्या शेणापासून वस्तू बनवणे’ ही कल्पना पुढे आली.
गणपतीसाठी एक हजार मूर्तींच्या ऑर्डर्स
तयार केलेल्या वस्तू प्रथम घरच्या हॉटेलमध्ये विक्रीस ठेवल्या. सुरुवातीचे काही दिवस विक्री झाली नाही; मात्र पहिल्या ग्राहकानंतर मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. आज या वस्तूंना स्थानिकांसह दिल्ली, मुंबई, अयोध्या तसेच परदेशातूनही मागणी आहे. भीमथडी जत्रेत सहभाग घेतल्यानंतर व्यवसायाला अधिक गती मिळाली. गणपतीसाठी ८०० ते एक हजार मूर्तींच्या ऑर्डर्ससह अनेक मोठ्या मागण्या मिळाल्या, असे सायली निघोट यांनी सांगितले.
कुटुंबीयांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच व्यवसायात यश आले आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘माझं वृंदावन’ हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरणपूरक व्यवसायातून महिलांना स्वावलंबी करण्याचा नवा आदर्श निर्माण करत आहे.
- मानसी निघोट, संस्थापक -‘माझं वृंदावन’ निघोटवाडी, ता.आंबेगाव
शेणापासून बनविलेल्या आकर्षक वस्तू
वारकरी, गौराई
गणपती, नेम प्लेट
पेन स्टँड, कार्टून्स
की होल्डर, किचेन
विविध प्राणी
15128, 15129, 15130
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

