गाईच्या दूध दरात उद्यापासून वाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

कात्रज - गाईच्या दुधाचा खरेदी दर पंचवीस रुपये, तर विक्री बेचाळीस रुपये प्रतिलिटर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समितीने रविवारी घेतला. दूध उत्पादकाला तीन रुपयांची वाढ देतानाच विक्रीत दोन रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. दहा जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर हे दर लागू होणार असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केली. अमूल, हडसन व चेन्नईच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धारही या वेळी करण्यात आला. 

कात्रज डेअरीत झालेल्या बैठकीत राज्यातील सहकारी व खासगी दूध संस्था असा भेद बाजूला सारून एकत्र येत संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. यात सहकारी व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. सांगली, सातारा व कोल्हापूर दूध असोसिएशनच्या धर्तीवर राज्यातील दूध व्यावसायिकांची असोसिएशन स्थापन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. 

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समिती आता महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती या नावाने यापुढे कार्यरत राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी व खासगी दूध संस्थांच्या पन्नासहून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

चर्चेअंती दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दहा जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर गाईच्या दूध खरेदी दरात तीन रुपये प्रतिलिटरने वाढ, तर विक्रीत दोन रुपयांची वाढ करण्यात आली. दूध खरेदीचा सध्याचा दर बावीस, तर विक्रीचा दर चाळीस रुपये प्रतिलिटर आहे. 

या वेळी संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, विनायकराव पाटील, गोपाळ म्हस्के, प्रकाश कुतवळ, विजय पाटील, प्रकाश तावरे, गिरीश चितळे, विलास तनपुरे, शीतल थोटे आणि संचालकांनी आपले विचार मांडले.

Web Title: Cow milk price increase from tomorrow