बारामतीच्या आयुर्वेदीक महाविदयालय व रुग्णालयासाठी 394 पदांची निर्मीती | Ayurvedic Hospital Posts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Job
बारामतीच्या आयुर्वेदीक महाविदयालय व रुग्णालयासाठी 394 पदांची निर्मीती

बारामतीच्या आयुर्वेदीक महाविदयालय व रुग्णालयासाठी 394 पदांची निर्मीती

बारामती - येथील नव्याने सुरु होणा-या 100 विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व संलग्नित 100 बेडच्या शासकीय आयुर्वेदीक रुग्णालयासाठी 394 पदे निर्माण करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. या बाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्याल व संलग्नित रुग्णालय निर्मितीस मान्यता देण्यात आली असून सन 2022-2023 पासून हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या मध्ये 230 पदे नियमित स्वरुपात निर्मित करण्यात आली असून 164 पदांची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा: सांग सांग भोलेनाथ शाळा सुरू होईल का; चिमुकल्यांची विचारणा

या अध्यादेशानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रती वर्षी पुढील टप्प्यातील पदे निर्माण होणार आहेत. या मध्ये एक अधिष्ठाता, 14 प्राध्यापक, 14 सहयोगी प्राध्यापक, 17 सहायक प्राध्यापक, एक प्रशासकीय अधिकारी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी 57 अशी एकूण 104 पदे निर्माण करण्यात आली आहेत. या शिवाय रुग्णालयासाठी 126 नियमित पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

यात महाविद्यालयाच्या पहिल्या टप्प्यासाठी 58 नियमित पदे असून 39 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरती केली जातील. राज्य शासनाने बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या बांधकाम व यंत्रसामग्रीसाठी मान्यता दिलेली होती, आता पदनिर्मिती साठी उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिल्यानंतर या बाबतचा अध्यादेश जारी झाला आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु असून स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार याचा पाठपुरावा करीत आहेत. बारामती मोरगाव रस्त्यावरची जागा या महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असून त्या दृष्टीने कामही सुरु करण्यात आले आहे. बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून आता आयुर्वेदीक महाविद्यालय सुरु होत असल्याने बारामती आगामी काळात मेडीकल हब म्हणून नावारुपाला येणार आहे.

loading image
go to top