#कमिशन_बाज सिलिंडर खर्च चौदापट वाढला

ज्ञानेश सावंत
शनिवार, 13 एप्रिल 2019

दाहिन्या बंद पडूनही गॅसचा हिशेब 
महापालिकेकडील १२ गॅस दाहिन्यांपैकी सहा गॅस दाहिन्या पूणपणे जुनाट आहेत. त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. त्यामुळे महिन्यांतून अनेक दिवस त्या बंद असतात. दुरुस्तीच्या नावाखाली बंद करून कामे होत नाही. तरीही, या दाहिन्या सुरू असल्याचे दाखवून त्याच्यासाठी सिलिंडरचा वापर होत असल्याच्या नोंदी आहेत. यामुळे बंद दाहिन्यांतून पैसे कमविले जात असल्याचे स्पष्ट होते.

पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे, त्याआधीच्या वर्षात हा खर्च फक्त सात लाख रुपये होता. या काळात मृतांची संख्या फारशी वाढली नसूनही गॅस सिलिंडरचा खर्च चौदापट वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

शहरातील ४२ स्मशानभूमींमध्ये वर्षाला २९ ते ३० हजार मृतांवर अत्यंसंस्कार होत असल्याचा ढोबळ हिशेब महापालिकेकडे आहे. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीसोबत विद्युत, गॅस आणि डिझेल अशा २१ दाहिन्यांची सोय आहे. त्यौपकी सहा दाहिन्या ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी अडीचे ते पावणेतीन कोटी रुपये उधळले गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. 

वेगवेगळ्या स्मशानभूमीत १२ गॅस दाहिन्या असून, सिलिंडर पुरविण्यासाठी ठेकेदराची नेमणूक केली आहे. दाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या जबाबदारीवरून चालढकल करणाऱ्या विद्युत आणि आरोग्य विभागाकडून आर्थिक हिशेब अचूक मांडला जात आहे. गॅसदाहिन्यांपाठोपाठ विद्युतदाहिन्यांचाही खर्च फुगविण्यात आला असून, तो एक कोटी ६४ लाख रुपये दाखविण्यात आला आहे. सध्या आठच विद्युत दाहिन्या आहेत. मात्र, त्यांच्या वीज बिलांसह वीजपुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षात १ कोटी ६४ लाख रुपयांची बिले काढण्यात आली.    

कंत्राटी कामगारांसाठी वर्षाला २.८५ कोटी 
आरोग्य विभागाने मृतांचे वाढलेले प्रमाण आणि स्मशानभूमीची स्थिती लक्षात कंत्राटी कामगारही नेमले आहेत. प्रत्येक स्मशानभूमीत कोणत्या कामांसाठी किती कामगार हे आरोग्य निरीक्षकांना ठाऊक आहे; परंतु महिन्याकाठी त्यांना किमान १५ हजार रुपये पगार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. वर्षानुवर्षे एकाच ठेकेदाराकडून कामगार घेतले जातात. त्यांच्या पगारासाठी वर्षाला २ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद आहे.

Web Title: crematorium Gas Cylinder Commission Expenditure