गुप्तधनासाठी केला लाखोनी खर्च... हाती लागला... 

चंद्रकांत घोडेकर
मंगळवार, 30 जून 2020

गुप्तधन मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या पंजाबमधील व्यक्तीवर आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घोडेगाव (पुणे) : गुप्तधन मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या पंजाबमधील व्यक्तीवर आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे
    
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची तक्रार तुषार घोलप याने सोनू ओमदत्त शर्मा (सध्या रा. घोडेगाव, मूळ रा. विश्वकर्मा मंदिर, लुधीयाना, पंजाब) याच्याविरोधा घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुसार शर्मा याची घोलप याच्याबरोबर प्लंबिंग काम करण्याच्या वेळी ओळख झाली. त्यावेळी त्याने, तुला पैशाची गरज असेल तर तुला गुप्तधन मिळवून देतो. यासाठी तुला खर्च करावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार सन २०१७ मधील जुन व जुलै महिना ते २८ जुन २०२० पर्यंत कळंब, घोडेगाव व भोरगिरीच्या हद्दीमध्ये जाऊन घोलपकडून वेळोवेळी पैसे घेतले. एकंदरीत १ लाख ५०  हजार रूपये घेतले. तसेच, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील ब-याच लोकांना गुप्तधन काढून देतो, असे सांगून शर्मा याने फसवणूक केली असल्याचे घोलप याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.    

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

याबाबतचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करत आहे. सोनू शर्मा या व्यक्तीने गुप्तधन मिळवून देतो किंवा इतर कोणतेही आमीष दाखवून लोकांची फसवणूक केली असल्यास संबंधित व्यक्तींनी न घाबरता घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रदिप पवार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime of cheating by claiming to get secret money