दीपक मानकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल
पुणे - जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह सहा जणांविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

जगताप यांनी शनिवारी (ता. २) रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत मानकर, कर्नाटकी यांच्यासह फोटोतील अन्य लोकांमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश (वय २८, रा. घोरपडी पेठ) याने फिर्याद दिली. पोलिसांनी मानकर यांच्यासह सहा जणांविरोधात कलम ३०६, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. रास्ता पेठ येथे समर्थ पोलिस ठाण्यासमोरील जमिनीवर जगताप यांचा ताबा आहे. या जमिनीचा जगताप यांच्यासह मानकर व कर्नाटकी यांच्यात व्यवहार सुरू होता. कोऱ्या कागदावर सह्या घेण्यासाठी जगताप यांच्यावर दबाव टाकला जात होता; परंतु योग्य मोबदला मिळाल्यानंतर सह्या करू, असे जगताप यांनी सांगितले. त्यावर मानकर यांनी, ‘कागदावर सह्या करून जागेचा ताबा कसा मिळवायचा, हे तुला ठाऊक आहे. त्यामुळे घरी जाऊन विचार कर,’ असे त्यांना धमकावले. शुक्रवारी जगताप यांनी जयेशला ही हकिगत सांगितली. शनिवारी जगताप जागेवर गेले असता, विनोद भोळे व त्याच्या अन्य साथीदारांशी बोलणे झाले. त्यानंतर जगताप यांनी त्यांच्यासमवेत आलेल्या रिक्षाचालकाकडे कागदपत्रे देऊन घोरपडीत आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.